आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pipebomb In Mahanagari Express Train Puts Madhya Pradesh

...आणि अनर्थ टळला! कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याचा कट उधळला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-वाराणसी या दोन शहरांदरम्यान धावणारी महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. केवळ एका प्रवाशाच्या प्रसंगावधनामुळे हा अनर्थ टळला आहे, अन्यथा कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडणारच होती. दरम्यान एनआयए, रेल्वे पोलिस आणि एटीएसने या घटनेचा तपास सुरु केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री वाराणसीहून महानगरी एक्सप्रेस ही मुंबईकडे येत होती. ही गाडी मध्य प्रदेशातील सटणा परिसरातून मुंबईच्या दिशेने धावू लागल्यानंतर याच रेल्वेतून प्रवास करणा-या एका प्रवाशाला हिरव्या रंगात गुंडाळलेली एक वस्तू दिसली. प्रथम त्याने उत्सुकतेने पाहिले तर वायरिंगसारखे काहीतरी दिसले. त्यामुळे ही वस्तू संशयास्पद असल्याचे त्याला जाणवले. या प्रवाशाने लगलीच याबाबतची माहिती रेल्वेच्या सुरक्षा दलाला दिली. या वस्तूची पाहणी केली असता हा एक शक्तिशाली टाईमबॉम्ब असल्याचे रेल्वेच्या लोकांच्या लक्षात आले.
ही वस्तू ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी एक पत्रही दिसून आले. बॉम्बची तपासणी केली असता तो टाईमबॉम्ब असल्याचे लक्षात आले. तसेच या टाईमबॉम्बवर रात्री 10 वाजून 40 मिनिटांची वेळ होती. महानगरी एक्सप्रेस ही गाडी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकावर पोहचणार होती. त्यामुळे या टाईमबॉम्बद्वारे कल्याण रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्याचा कट होता असे तपास यंत्रणांच्या लक्षात आले. यानंतर तपास यंत्रणांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन मोकळ्या जागेत निष्क्रिय करण्यात आला. त्यावेळी त्या मोकळ्या जागेत चार मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून आले. जर हा बॉम्ब रेल्वे गाडीतच राहिला असता तर फार मोठा अनर्थ घडला असता. महानगरी एक्सप्रेसचे अनेक डबे उद्धवस्त झाले असते व कल्याण स्थानकावरील लोकांसह रेल्वेत प्रवास करणा-या लोकांच्या जीवावर हा प्रसंग बेतला असता. मात्र, एका चाणाक्ष प्रवाशाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
कल्याण स्टेशनवर घातपात करण्याचा डाव होता व तो हाणून पाडला आहे. या बॉम्बजवळ एक पत्रही सापडले आहे, मात्र त्यातला मजकूर कळू शकलेला नाही. या पत्रातील मजकूर समजून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करीत आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमंत्र्यांनी 10 कोटी खंडणी द्यावी असा त्यात मजकूर असल्याचे बोलले जात आहे. हा बॉम्ब यूपीतील माणिकपूर रेल्वे स्थानकादरम्यान ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. एनआयए, रेल्वे पोलिस आणि एटीएसने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.