आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्यात यंदा भीषण दुष्काळ पडल्याने पाण्याची नासाडी टाळून नागरिकांनी कोरड्या रंगाची होळी खेळावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले. रासायनिक रंग आणि पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहित रंगपंचमी साजरी करावी असेही ते म्हणाले. राज्य शासनाचा पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरणपूरक होळीसाठी जनजागृतीपर उपक्रम राबवून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक होळीच्या निमित्ताने शासनाच्या वतीने राज्यातील आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महापौर, महानगरपालिका तसेच शाळा, प्राध्यापक, विविध शासकीय कार्यालये, न्यायालये, वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे संपादक, आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाच्या आस्थापना यांना मुख्यमंत्री पत्र लिहून मुंबईतील नैसर्गिक रंग भेट म्हणून पाठवून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याचे आवाहन करणार आहेत.
या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील एक कोटी मोबाइलधारकांशी व्हॉइस कॉलच्या माध्यमातून थेट संवाद साधून रंगपंचमीला रासायनिक रंगांचा वापर करू नका, असे आवाहन करणार आहेत.
मंत्रालयात नैसर्गिक रंग- पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने मंत्रालयात नैसर्गिक रंगांच्या विक्रीचा स्टॉल उभारला जाणार आहे. या वेळी राज्यभरातील प्रमुख वाहिन्यांवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री जनतेशी प्रदूषणमुक्त होळीचा संदेश देऊन संवाद साधणार आहेत.
छायाचित्र : रंग चढू लागला - देशात बुधवारी साजरी होणार्या रंगपंचमीचा रंग आतापासून चढू लागला आहे. एका होळीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान शुक्रवारी अभिनेत्री हृषिता भट्टची टिपलेली छबी. (छाया: एजन्सी)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.