आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांविरुद्ध याचिका; आयोगावरही कारवाईची मागणी, राष्ट्रवादी मंत्र्यावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दोनदा मतदान करण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख, खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पवारांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई केली नसल्याचे माझगाव न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल मुलाणी यांनी ही याचिका दाखल केली असून शरद पवार आणि निवडणूक आयोग या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवारांनी शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे आवाहन केले होते. आयोगाने त्यांना तंबीही दिली होती.
देशमुखांना बैठक भोवली
अमरावती - प्रचार संपल्यानंतरही हॉटेलात रेशन दुकानदारांची बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्यावर बुधवारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ व रिपाइंचे उमेदवार राजेंद्र गवई यांनी देशमुखांविरोधात तक्रार दाखल केली होती.
उदयनराजेंवर गुन्हा
सातारा - राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन जमलेल्या लोकांना जेवणावळी घातल्याप्र्रकरणी सातार्‍याचे खासदार व पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला. भोसले व आयोजक अ‍ॅड. दत्तात्रय बनकर यांनी कल्याण रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम घेऊन मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.