आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान कोण? \'एनडीए\'ने मित्र पक्षांनीही विश्वासात घ्यावे- शिवसेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुस्थानचे पुढील पंतप्रधान कोण? यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच धुमशान सुरु झाले आहे. निवडणुका होतील तेव्हा होतील, पण निवडणुकीआधीच पंतप्रधानप्रदावरून राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्या चिरफळ्या उडत असतील तर तो एक विश्व विक्रमच ठरावा; अशी कोपरखळी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून उडवण्यात आली आहे.

'बाजारात तुरी आणि भट भटणील मारी' अशा मराठीतील म्हणीनुसार राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीत हाणामारी सुरु आहे. अद्याप बहुमताचा पत्ता नाही. सत्तासुंदरीचा पत्ता नाही आणि वरपिते आपापले 'नवरदेव' घेवून लग्नमंडपात चेंगराचेंगरी करताहेत. एक दुसर्‍याला लाथा घालीत आहेत, अशी खिल्लीही उडवण्यात आली आहे.

हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणजे अनेक ठिकाणी होतात तसे सामुदायिक विवाह सोहळे नाहीत असे सांगण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांनी एकत्र बसून याबाबत काय तो एकदाचा निर्णय घेवून टाकावा, अशी भूमिका शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केली आहे.

'आम्ही भाजपसोबत आहोत परंतु मोदी यांच्या बरोबर नाही,अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी घेतली आहे. थोडक्यात नितीशकुमार यांचे मुसलमानी मतांचे गणित असल्याने त्यांना हिंदुस्थानी विचारांचा पंतप्रधान नको आहे, असे सांगून नितीशकुमारांना टोला लगावला आहे.

अयोध्येवरून येणार्‍या साबरमती एक्स्प्रेसने गोध्रा येथे पेट घेतला. साबरमती एक्स्प्रेची प्रतिक्रिया म्हणजे गोध्रा दंगल होती. मोदी यांच्या जागी केशूभाई किंवा कॉंग्रेसचे वाघेला असते तरीही हीच प्रतिक्रिया उमटली असती, असे सांगून शिवसेनेने मोदीबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पक्षाचा एक गट मोदी यांच्या नावाने पंतप्रधानपदाच्या तुतार्‍या फुंकत बसला आहे. त्यावरून गोंधळ घातला जात आहे. पण मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खरोखर आहेत काय? असाही प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या धुरिणांनी एकदाच काय ते सांगायला हवे आणि त्यासंदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावून पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा घोळ तत्काळ संपवायला हवा, अशी भूमिका शिवसेनेने स्पष्‍ट केली आहे.

भाजपला त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्याचे अधिकार आहे, पण स्वबळावर ते पंतप्रधान नेमू शकत नाही कारण हा अर्जुनाचा रथ आहे व त्यास अनेक घोडे आहेत. प्रत्येक घोड्यास महत्त्व आहे. नाहीतर वेगळे 'महाभारत' घडून येथे अर्जुनाच्या रथाचेच चाक रुतू शकते, असा इशाराही शिवसेनेने दबक्या आवाजात दिला आहे.

भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विश्वासात घ्यावे लागणार आहे. राजकीय फायद्या- तोट्याची गणिते मांडावी लागणार आहेत.