आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडच्या रेल्वेमार्गाला पंतप्रधान नरेंद्र माेदी देणार गती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या अविकसित भागात रेल्वे प्रकल्प सुरू करून त्या भागाचा विकास करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार बीड- परळी वैजनाथ- अहमदनगर या रेल्वे मार्गाच्या कामाला आता चांगलाच वेग येण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी २७ मे राेजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यात हा रेल्वेमार्ग पूर्णत्वाला नेण्यासाठी विशेष प्राधान्य राहील, अशी आशा मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी पंतप्रधान आग्रही आहेत. पंतप्रधानांनी एखाद्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याचे ठरवले की लगेच त्या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभाग हालचाल करतात आणि फाइल हातावेगळी करतात. मागील वेळी आम्हाला याचा चांगला अनुभव आला. त्या वेळी पंतप्रधानांनी नवी मुंबईतील विमानतळाबाबत चर्चा करण्याचे ठरवले. आम्हाला यासाठी सात परवानग्या हव्या होत्या. पंतप्रधानांशी चर्चा होणार म्हटल्यानंतर लगेचच सहा परवानग्या मिळाल्या. या विमानतळाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधानांनी याबाबत माहिती विचारल्यानंतर आम्ही दिली आणि एक परवानगी मिळणे बाकी असल्याचे सांगितले, तेव्हा तीन आठवड्यांत परवानगी मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रत्यक्षात दोनच आठवड्यांत आम्हाला परवानगी मिळाली. आता या वेळीही या रेल्वे प्रकल्पाबाबतच्या सर्व अडचणी दूर होतील,’ असेही क्षत्रिय म्हणाले.

राज्यातील अन्य कोणते प्रकल्प चर्चेला घेणार आहात? या प्रश्नावर क्षत्रिय म्हणाले, ‘आमच्याकडून काेणतेही विषय सांगितले जात नाहीत. पंतप्रधानच प्रकल्प निवडतात आणि चर्चा करतात. देसाईगंज- वडसा हा गडचिरोलीतील रेल्वे प्रकल्पही प्रलंबित आहे; परंतु पंतप्रधानांनी बीडचा प्रकल्प निवडल्याने हा प्रकल्प आता लवकरच सुरू होणार आहे.’

१४४ काेटींची तरतूद
परळी- बीड- नगर या २६१.२५ कि.मी. रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी ५० टक्के सहभाग राज्य सरकार देणार आहे. या रेल्वे मार्गाच्या कामासाठी राज्य शासनाने आतापर्यंत १९८.७५ कोटी निधी वितरित केला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आताच्या रेल्वे अर्थसंकल्पात १२५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अर्थसंकल्पाव्यतिरिक्त १८.८८ कोटी रुपये अशी एकूण १४४.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...