आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadnavis To Accompany PM Modi On China Visit

चीन दौरा: PM मोदींची फडणवीसांना पुन्हा पसंती, CM नी जपान दौरा ढकलला पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 ते 18 मे दरम्यान 5 दिवसाच्या चीन दौ-यावर जात आहेत. या दौ-यासाठी पंतप्रधान मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित केले आहे. दरम्यान, चीन दौ-याचे निमंत्रण अचानक आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला पूर्वनियोजित जपान दौरा पुढे ढकलला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनाही या दौ-यात समाविष्ट करण्यात आले आहे.
जर्मनी येथे झालेल्या औद्योगिक प्रदर्शनातही नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा समावेश केला होता. आता चीन दौ-यावर जाताना ते पुन्हा फडणवीसांना घेऊन जाणार आहेत. चीनने उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे. यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री विविध प्रकल्पांना व भागांना भेट देणार आहेत. चीन विविध उत्पादने कमी किमतीत कशी काय बनवतो? चीनमधील उत्पादन व्यवस्था व प्रक्रियेची माहिती घेणे हा या दौ-याचा मुख्य उद्देश आहे.
चीनच्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच चीनमधील उत्पादन कौशल्याचा 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत सर्व अंगांनी विचार करणे, हा या दौ-यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी राज्ये अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी आपल्यासमवेत चीन दौ-याचे निमंत्रण धाडले आहे. देशाच्या प्रगतीत व उत्पादन क्षेत्रात वरील राज्यांनी अग्रेसर भूमिका बजावली आहे. या राज्यांनी चीनच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, तसेच आपल्या राज्यांमध्ये बदलत्या प्रवाहानुसार व कालानुरूप बदल कसे करता येतील याची तपशिलात जाऊन नोंद घ्यावी, असा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे पंतप्रधान कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस चीनमध्ये पंतप्रधान यांच्यासमवेत काही प्रमुख कार्यक्रमांना हजेरी लावतील. 14 मे रोजी चीनमधील झेंगझाऊ येथे फॉक्सकॉन या बड्या उद्योग समुहाच्या प्रकल्पाला ते भेट देतील. त्यावेळी फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गोयू यांच्याशी ते भारत व महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी यावर चर्चा करतील. त्यानंतर फडणवीस 15 मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत विविध देश आणि प्रांत नेत्यांच्या फोरमच्या बीजिंगमध्ये आयोजित परिषदेत सहभागी होतील.
16 मे रोजी बीजिंग येथे चायना बँकेचे पदधिकारी आणि विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा करतील. तसेच चीनमधील दुनहुआंग शहरात जाऊन ते औरंगाबादचा विकास दुनहुआंगच्या सहकार्याने तर दुनहुआंगचा विकास महाराष्ट्राच्या सहकार्याने करण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी करतील. 18 मे रोजी क्यूइनडाओ (शँगडाँग) येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत फडणवीस संबोधित करतील.