आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Weak, CM Inactive, Uddhav Thakare Critised In Shivbandhan

पीएम दुबळे, तर सीएम कारभारशून्य, शिवबंधन सभेत उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देश व राज्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याची ही अखेरची संधी आहे. ती गमावू नका. पुन्हा शिवशाहीचे सरकार सत्तेवर आणा, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. मनमोहनसिंग दुबळे पंतप्रधान असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कारभारशून्य आहेत, अशी टीकाही उद्धव यांनी केली. पदाची मागणी न करता शिवसैनिक राहिलेल्यांना मुद्दाम व्यासपीठावर बसवल्याचे सांगत मनोहर जोशींसह पक्षातील इतर नेत्यांना त्यांनी कानपिचक्याही दिल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना एकनिष्ठ राहण्यासाठी शिवबंधनात बांधून या वेळी प्रतिज्ञाही देण्यात आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सोमय्या मैदानावर प्रतिज्ञादिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, मी मुद्दाम दिवसा सभा घेतली. कारण रात्रीच्या काळोखात गर्दी दिसत नाही. या गर्दीचा फायदा मी स्वार्थासाठी करणार नाही आणि दुरुपयोगही करणार नाही. पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही. मंत्रिमंडळात असलेले कर्तृत्वाने नव्हे तर नशिबाने बसलेले आहेत. म्हणून लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घ्यावात म्हणजे एकदाच काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड देता येईल आणि पुढचा पंतप्रधान व मुख्यमंत्री युतीचाच असेल, असा विश्वास व्यक्त करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्‍ट्रवादीवाले जाती-धर्मात तेढ निर्माण करून आग लावण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा उद्धव यांनी दिला. शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुस्लिमांचा कैवार घेतला आहे. परंतु निरपराध मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याच्याशी भेदभाव व्हायला नको, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आदर्श चौकशीचे नाटक केले. मंत्र्यांना सोडून अधिका-यांना लटकवले. ऑपरेशन सक्सेसफुल, पण पेशंट खल्लास असे त्यांचे काम असल्याची टीका उद्धव यांनी केली.
शिवसेनाप्रमुखांनी दिली शपथ
प्रतिज्ञा दिनासाठी आलेल्या शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शपथच घ्यायला लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकनिष्ठ राहाण्याची प्रतिज्ञा दिली.
प्रजासत्ताकदिनाचा संदर्भ चुकला
भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसच्या पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून हे शेवटचे भाषण असेल. खरे तर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून प्रजासत्ताकदिनी नव्हे, तर स्वातंत्र्य दिनी भाषण देतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून हा संदर्भ चुकला.