मुंबई - ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला...’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा...’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई...’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे कविवर्य प्रा. शंकर वैद्य यांचे मंगळवारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.आंतरिक ऊर्मीने लेखन करणारे वैद्य सर नवलेखक-कवींसाठी ऊर्जास्रोत ठरले होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यातील वृत्तछंदातील देखण्या कवितांच्या काळाचा एक महत्त्वाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
‘शब्द कुठे जाई उणा
नजरा जुळल्या न कुठे
स्वार्थ कुठे होई उणा
तुटल्या वाटांवर मन घाली येरझारा !’
अशी भावकविता बदलत्या काळातही टिकवून ठेवणारे कवी वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी झाला होता. आेतूर, जुन्नर असा शैक्षणिक प्रवास, पुढे पुण्यात शेतकी खात्यात नोकरी असे करत वैद्य यांचा रविकिरण मंडळातील कवी गिरीश, कवी यशवंत यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचे काव्यविश्व विस्तारत गेले. ‘कालस्वर’ आणि ‘दर्शन’ हे कवितासंग्रह आणि ‘आला क्षण गेला क्षण’ हा कथासंग्रहही त्यांनी लिहिला. रेव्हरंड टिळकांच्या कवितेचा लहानपणी त्यांच्यावर प्रभाव होता. पुढे कुसुमाग्रजांच्या कवितांनी त्यांना प्रभावित केले. साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी आक्रमक कवितांचा काळ असताना त्या बदलांचा त्यांच्या कवितांमध्ये स्वीकार दिसत असला, तरी त्यांच्या कवितेतला भाव मात्र कधीच लोपला नाही.
बीए आणि एमए करत असतानाच त्यांचा पत्नी सरोजिनी वैद्य यांच्याशी परिचय झाला होता. सरोजिनीबाई मराठीच्या प्राध्यापिका आणि उत्तम समीक्षक होत्या. त्यांच्या निधनानंतर वैद्य विलक्षण एकाकी झाले होते. अत्यंत मृदू स्वभावाचे म्हणून साहित्य वर्तुळात लोकप्रिय असलेल्या वैद्य यांच्या जाण्याने मराठी साहित्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. या वेळी कवी अरुण म्हात्रे, कवी अशोक नायगावकर, कवी नीलेश पाटील, उषा तांबे, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ आदी मान्यवर उपस्थित होते. सायन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्य यांच्यामागे त्यांचा मुलगा निरंजन वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.