आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत विभागाची नावे बदलल्यास काळे फासू, शिवसेना पक्षप्रमुखांचा व्यावसायिकांना दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेले अनेक महिने जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असलेले राज्याचे गृहनिर्माण धोरण अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घाटकोपर येथील युतीच्या जाहीर सभेत घोषित करण्यात आले. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या धाेरणात केवळ मुंबईबाबतच्याच योजनांची घोषणा करण्यात आली. राज्यासाठीचे हे धोरण तीन- चार टप्प्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या विभागांची नावे परस्पर बदलणाऱ्या बिल्डरांना सज्जड दम भरला, तर ‘उद्धव ठाकरे हे अामचे मार्गदर्शक अाहेत’ असे गाैरवाेद्गार फडणवीस यांनी काढले.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण धोरणाची घोषणा करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघाची निवड केली, हे विशेष. या जाहीर सभेला भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबईच्या एकूण भूभागापैकी ६३ टक्के भागावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही. फक्त ३७ टक्के भूभागावर एक कोटीहून अधिक लोकसंख्या राहते. त्यांच्यासाठी चांगली घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे नवे गृहनिर्माण धोरण आखण्यात आलेले आहे. सामान्य माणसांसाठी घेतलेले कोणतेही निर्णय भाजप- शिवसेनेचे सरकार बदलणार नाही. आडमुठ्या धोरणामुळे गेल्या आठ- दहा वर्षात पुनर्विकासाचे कुठलेही काम होऊ शकले नाही. नवीन गृहनिर्माण धोरण हे बिल्डरांसाठी नसून सामान्य माणसांकरिता आहे. क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास झाला तर सामान्य नागरिकांसाठी चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करता येतील. मुंबईप्रमाणेच उपनगरातही क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच विमानतळाच्या आसपास असलेल्या झोपडपट्टीधारकांना त्याच भागात घरे देण्यात येतील,’ अशी घाेषणाही फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच गृहनिर्माण धोरण जाहीर केल्याबद्दल प्रकाश मेहता आणि सरकारला धन्यवाद दिले. ‘मुंबईकरांना घरे देण्यासाठी गृहनिर्माण धोरण युती सरकारच्या काळातच आखले होते. मात्र सरकार गेले आणि नव्या सरकारने फक्त बिल्डरांच्याच हिताचा निर्णय घेतला. युतीचे सरकार तेव्हा टिकले असते तर सामान्यांना त्यावेळेसच माफक दरात घरे मिळाली असती. या नव्या धोरणामुळे आता मुंबईकरांना स्वस्तात घरे मिळतील. मुंबईकरांना हक्काचे घर मिळावे म्हणून शिवसेनेने आंदोलने केली, आघाडी सरकारच्या काळात मात्र प्रश्न सुटले नाहीत,’ याकडे ठाकरेंनी लक्ष वेधले. ‘काही बिल्डर घरे विकण्यासाठी मुंबईच्या मूळ जागांची नावे बदलत आहेत. अप्पर वरळी, बीकेसी अॅनेक्स अशी नावे ठेवली जात आहेत. या बिल्डरांना मुंबईच्या भागाची नावे बदलण्यास कायद्याने बंदी घालावी. जर हे प्रकार थांबवले नाहीत, तर शिवसैनिक अशा फलकांना काळे फासतील,’ असा इशाराही त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला.
पुढील स्लाइड्सवर वचा, काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे..
बातम्या आणखी आहेत...