आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण, कोणताही गुन्हा नोंद नसताना कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोणताही गुन्हा नोंद नसताना वांद्रे पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे दोन महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मारहाणीदरम्यान पोलिस ‘भारत सोडून पाकिस्तानात जा' अशी भाषाही वापरत असल्याचा आरोप पीडित तरुणांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

आसिफ शेख (१९) आणि दानिश शेख (१९) अशी या तरुणांची नावे असून ते मुंबईतील रिझवी महाविद्यालयात शिकतात. आसिफ हा एका व्यायामशाळेत प्रशिक्षकाचेही काम करतो. ‘भाभा रुग्णालयात दाखल शेजाऱ्याला भेटून परतत असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास बांद्रा रिक्लेमेशन येथून या दोघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यात नेऊन पट्टा आणि दंडुक्याच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. नंतर यापैकी एकाने घरच्यांना फोन करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांना साेडण्यात आले,’ अशी तक्रार या दोघांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, मारहाणीच्या विरोधात आपली तक्रार नोंदवण्यासही पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप या तरुणांच्या नातेवाइकांनी केला आहे. पोलिसांच्या दबावामुळे गंभीर जखमी झालेल्या आसिफ शेखला उपचारासाठी दाखल करून घेण्यास भाभा रुग्णालयाने नकार दिल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.

आसिफ रुग्णालयात
या प्रकाराची दखल घेऊन मुंबई पोलिस आयुक्त अहमद जावेद यांनी परिमंडळ नऊचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली, तर या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस आयुक्त संजय कदम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या आसिफ शेखवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.