आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Did Not Act Even Though They Were Given Alert

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्‍फोटः अलर्ट मिळूनही पोलिस यंत्रणा गाफील!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुण्यात बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने 3 मे रोजीच राज्य सरकारला अलर्ट पाठवला होता; परंतु गृह विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा घातपात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोटात फारशी जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या स्थळांवर लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असे या 3 मे 2012 रोजी मिळालेल्या गुप्तवार्ता संदेशात नमूद होते. गुजरातच्या किनारपट्टीचा फायदा दहशतवादी घेतील, अशी शक्यताही संदेशात वर्तवण्यात आली होती. हा संदेश मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी पुण्यात खरोखरच स्फोट घडवून आणण्यात आले; परंतु मध्यंतरीच्या दोन महिन्यांच्या काळात गृह विभाग आणि पोलिस यंत्रणा गाफील राहिल्यानेच घातपात घडवणा-यांचे फावले, असे बोलले जात आहे.

गृहमंत्र्यांची फिरवाफिरवी

पूर्वी : होय, संदेश मिळाला
मुंबई व पुण्यात पाच दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया घडवण्याचा संदेश आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही बाब कबूल केली होती. पुण्यातील गर्दीची ठिकाणे, हॉटेल, लॉज व संवेदनशील ठिकाणांच्या तपासणीसह सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले होते.
आज : तसा संदेशच नव्हता
मुंबईत अधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी गृहमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्फोटांच्या तपासासाठी एटीएस व पुणे पोलिसांच्या संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. एनआयएही तपास करत आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, असा स्फोट होणार असल्याची कोणतीही माहिती कें द्रीय गुप्तहेर संघटनांकडून मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

पाकमध्ये जाऊन अड्डे उद्ध्वस्त करा
‘देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकमध्ये जाऊन त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजेत. त्यासाठी पाकबरोबर थेट लढाई करण्याची गरज आहे,’ असे मत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी व्यक्त केले.
पुण्यातील स्फोट झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कसाब, अफझलला फाशी देत असाल तर आम्ही तुमच्या देशात स्फोट घडवू, अशी धमकी दहशतवादी देत आहेत. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात आहे का याचा तपास झाला पाहिजे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिक्षण, माहिती-तंत्रज्ञानाचे केंद्र असलेले पुणे दहशतवाद्यांचे टार्गेट आहे. हे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी आरपार लढाईची भाषा केली होती. त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट केला पाहिजे, असे आठवले म्हणाले.