आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटक्षणी मदतीस धावणार "एफआयआर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागरिकांना पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधता यावा व तक्रारीच्या त्वरित निवारणासाठी मीरा रोड पोलिस ठाण्याने ‘एफआयआर’ हे मोबाइल अॅप तयार केले होते. ते इतके लोकप्रिय आणि प्रभावी ठरले की पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ते राज्यभरात वापरण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ७ जानेवारीला हे अॅप कर्नाटक सरकारतर्फेही जनतेच्या सेवेत सादर केले जाईल.

प्रत्यक्ष नियंत्रण कक्षाला फोन न करताही हे अॅप आयकॉनवर काही सेकंद बोट ठेवून तत्काळ पोलिसांची मदत मिळवून देते. महिनाभरात ५७ देशांतील दीड लाख लोकांनी अॅप डाऊनलोड केले आहे. संकटकाळात पोलिसांशी तत्काळ संपर्क होत नाही वा १०० क्रमांकावर तत्काळ फोन लागत नाही. यावर ठाणे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास बावचे यांच्या पुढाकाराने एफआयआर (फर्स्ट इमिजिएट रिस्पॉन्स) हे मोबाइल अॅप तयार झाले.

‘जिओ फेन्सिंग’ तंत्रज्ञानाचा वापर
महाराष्ट्रातील सर्व पोलिस नियंत्रण कक्षांत हे अॅप कार्यान्वित व्हावे म्हणून हालचाली सुरू आहेत. सध्या अॅपद्वारे आधी मीरा रोड नियंत्रण कक्षाशी संपर्क होतो. नंतर तेथून संबंधित ठाण्याला संपर्क होताे. लवकरच ‘जिओ फेन्सिंग’ हे तंत्रज्ञान वापरून जवळच्या पोलिस नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क होईल. ‘इंटेक-एम्पायर’चे इक्बाल महाडिक यांनी अॅप विकसित केले आहे.

अशी आहेत ‘एफआयआर’ची वैशिष्ट्ये
- अँड्रॉइड, आयफोनवर डाऊनलोडची सुविधा. - अॅपवर बाेट ठेवले की होतो नियंत्रण कक्षाशी संपर्क. - नागरिकांचा मोबाइल क्रमांक, ठिकाण, नाव आदी माहिती मीरा रोड पोलिस ठाण्यातील नियंत्रण कक्षात संगणकांवर झळकते. - अधिकारी त्या क्रमांकावर फक्त ‘कर्सर’ ठेवतात आणि त्या क्रमांकावर संपर्क साधला जातो. जवळच्या बीटमार्शलला त्या ठिकाणी ताबडतोब पाठविले जाते.

नागरिकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी ‘इंटेक-एम्पायर’ या सॉफ्टवेअर सोल्युशन समूहास हे काम दिले. आता दिवसाला सुमारे १ हजार नागरिक या अॅपद्वारे आमच्याशी संपर्क साधत आहेत. ही सेवा २४ तास सुरू आहे. - सुहास बावचे, डीवायएसपी ठाणे ग्रा.