आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून आता ३ ते २१ दिवसांत महत्वाची प्रमाणपत्रे देण्‍याचे बंधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसांकडून परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अनेकदा खेटे घालून हैराण होणाऱ्या सामान्य नागरिकांना राज्य सरकारकडून दिलासा मिळाला आहे. सभा-संमेलने, मिरवणूक, शोभायात्रांसाठी आलेल्या अर्जावर आठवडाभरात, लाऊडस्पीकर परवान्यावर तीन दिवसात तर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठीच्या अर्जावर २१ दिवसांत निर्णय घेण्याचे बंधन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर घालण्यात आले आहे. केवळ पोलिस अधिकाऱ्यांनाच नव्हे तर मंत्रालयातील गृह विभागातील कक्ष अधिकाऱ्यांवरही विहित मर्यादेत कामाचे बंधन घालून देण्यात आले आहे.
जनतेला विशिष्ट मुदतीत त्यांची कामे पूर्ण करून देण्याचे बंधन प्रशासनावर लादण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश पूर्वीच जारी केला असून या अध्यादेशांतर्गत पोलिस प्रशासनाने कोणत्या सेवा किती दिवसांत पुरवाव्यात हे स्पष्ट करणारी अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.

गृह विभागाचे प्रधान सचिव बी. के. उपाध्याय यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या अधिसूचनेत पोलिसांशी संबंधित १७ सेवा किती दिवसात पुरवायला हव्या आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ती न पुरविल्यास कुठे दाद मागायला हवी, ही माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे परवान्यासाठी पोलिसांना टाळाटाळ करता येणार नाही आणि नागरिकांचेही खेटे वाचण्याची शक्यता आहे.