आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police's All Evidence Fake In Javkhede Dalit Massacra

जवखेडे हत्याकांडप्रकरणी पोलिसांचे सर्व पुरावे खोटे, कायदेशीर लढा देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जवखेडे हत्याकांडप्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना गोवण्यासाठी पोलिसांनी खोटे पुरावे उभे केल्याचा दावा जातीय अत्याचाविरोधी समितीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांचा कथितपणा जनतेसमोर आणण्यासाठी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार केल्याचे समितीचे म्हणणे आहे.

२० ऑक्टोबरला जवखेडेच्या जाधव कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती. प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही पोलिसांना ख-या गुन्हेगाराचा छडा लावण्यात अपयश आले. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. फडणवीस सरकारने आरोपींच्या शोधासाठी पोलिसांवर दबाव वाढवला. त्यामुळे पोलिसांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या चुलत भावांनाच आरोपी म्हणून अटक केली. गुन्हेगारांना अटक होताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, पण आंबेडकरी समाजातील असंतोष खदखदच राहिला. वास्तविक, पोलिसांनी अटक केलेले आरोपी खरे नाहीत, असे आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे म्हणणे आहे. सत्यशोधन समितीने जवखेडे हत्याकांडप्रकरणी बनवलेल्या या अप्रकाशित अहवालाची प्रत ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे. यात समितीने उपस्थित केलेले प्रश्न अहमदनगर पोलिसांचे वाभाडे काढणारे आहेत. या अहवालाने हे प्रकरण पुन्हा चर्चेत येणार असून आंबेडकरी संघटना खैरलांजीप्रमाणे मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात उभ्या असल्याचे दिसत आहे.

मदत कोटीवर, खाते सील
जाधव कुटुंबीयांना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी भरघोस मदत केली असून मदतीची एकत्रित रक्कम एक कोटीच्या घरात आहे. मात्र, अॅट्रॉसिटी कायद्याचा आधार घेत पोलिसांनी जाधव कुटुंबाची बँक खाती गोठवली आहेत.

थर्ड डिग्रीचा वापर
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत आणि अशोकचा पोलिस कोठडीत कबुलीजबाबासाठी छळ करण्यात आला. दोघांनाही नग्न करून उलटे टांगण्यात आले. विजेचा प्रवाह शरीरात सोडण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

समितीची निरीक्षणे
*पोलिसांनी जप्त केलेली हत्यारे शेतीकामाशी निगडित आहेत. त्याने शरीराचे तुकडे करणे शक्य नाही.
*नार्को टेस्ट करण्यापूर्वी अशोक व प्रशांतने काय बोलावे, यासाठी पोलिसांनी त्यांना विशेष टेप ऐकवली.
*प्रशांतच्या अंगावरील शर्ट पोलिसांनी जाळला व ते अशोकला ओळखण्यास सांगण्यात आले.
*कुटुंबीयांचे जुने कपडे, उकिरड्यावरील चपला, चुलीतील राख पुराव्यासाठी नेण्यात आली.
*जाधव कुटुंबातील व्यक्तींना अटक होणार हे माहीत असूनही मुख्यमंत्री १९ नोव्हेंबरला जवखेड्यात गुन्हेगारांना भेटण्यास का गेले?