मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मागणी केली होती. परंतु शरद पवार यांनी मी केंद्रातच ठीक असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामुहीक पध्दतीने निर्णय घेतले जातात असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ते षन्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होते. लोकसभेतील पराभवाची कारण मिमांसा करतांना त्यांनी कार्यकर्ता आणि नेत्यामधील अंतर कमी झाल्याचे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रातील जनता आपल्याला नव्याने सत्तेत निवडून देईल, असा जोरदार आशावादही त्यांनी मांडला. 'कार्येकर्त्यांची इज्जत राखा नाही तर कार्यकर्ते आपली जागा दाखवतात', अशी सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिली.
'काय वाट्टेल ते करु, पण आत्मविश्वासाने लोकांचा विश्वास संपादन करु असा निश्चय करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित पदाधिका-यांना दिल्या.
या मेळाव्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पक्षाने एक बॅनर तयार केला असून त्यावर 'ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची' अशा ओळी लिहिल्या आहेत. बॅनरवर पक्षाचे चिन्ह घड्याळ आणि नेते शरद पवार यांचा फोटो आहे. याव्यतिरिक्त त्यावर कोणताही संदेश नसेल. हेच बॅनर येथून पुढे पक्षाच्या कार्यक्रमात वापरण्यात येणार आहे.