आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Not Behave Well In Election Rally

मुलूख मैदानात प्रचाराची राळ, मातीशी तुटली नाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेला महिनाभर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वच उमेदवार व पक्षप्रमुख ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो मतदानाचा दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच पंचरंगी होत असलेली ही निवडणूक अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत वाद गाजले, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. अस्मितेच्या मुद्द्यांवरून शाब्दिक गुद्दागुद्दीही रंगली. या सगळ्या गदारोळात जनतेच्या मागण्या, समस्यांकडे साफ दुर्लक्षच झाल्याचे दिसले. रणधुमाळीतील काही ठळक घटनांची उजळणी...

दिग्गज अडकले बालेकिल्ल्यातच
पक्षाच्या राज्यभर प्रचाराची धुरा ज्यांच्यावर होती, त्या सर्वपक्षीय दिग्गजांना मात्र या वेळी आपल्याच मतदारसंघात अडकून राहण्याची वेळ आली. राज्यात त्यांनी काही ठिकाणी सभाही घेतल्या; मात्र ‘घार हिंडे आकाशी, लक्ष तिचे मतदारसंघाशी’ अशीच अवस्था या नेत्यांची होती.

पृथ्वीराज चव्हाण
राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. यंदा प्रथमच दक्षिण कराडमधून रिंगणात. काँग्रेसचेच बंडखोर व सात वेळा आमदार राहिलेले विलासकाका उंडाळकरांचे मोठे आव्हान. राष्ट्रवादीची ताकदही उंडाळकरांच्या मागे. ‘मिस्टर क्लीन’ अशी प्रतिमा असलेले चव्हाण हे काँग्रेसच्या प्रचारातील हुकमी एक्का; परंतु राज्यात ठिकठिकाणी सभा घेताना ‘नजर’ मात्र कराडकडेच.

अशोक चव्हाण
दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले. लोकसभेला मोदी लाटेतही विजयी. आता पत्नी अमिता चव्हाण भोकरमधून लढत आहेत. मात्र, मेहुणे भास्करराव खतगावकर, माधवराव किन्हाळकर व सूर्यकांता पाटील भाजपत गेल्याने चव्हाणांच्या वर्चस्वाला आव्हान. काँग्रेसने राज्याच्या प्रचार समन्वयाची जबाबदारी देऊनही मराठवाड्यातील काही मतदारसंघ वगळता कुठेही सभा दिसल्या नाहीत. नांदेड जिल्ह्यातच तळ ठोकून.

एकनाथ खडसे
भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे स्वयंघोषित उमेदवार. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून रिंगणात. युती तोडण्याचे खापर डोक्यावर फुटल्याने शिवसेनेचा परंपरागत मतदार नाराज. भाजपचे माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार. पक्षातीलच काही असंतुष्ट कार्यकर्त्यांचा रोष. शिवसेनेनेही युती तोडल्याचा मुद्दा तीव्र बनवून प्रचार सुरू केला. चोहोबाजूंनी अडचणीत आलेल्या व जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याचे आव्हान असल्याने खडसेंचा मुक्काम जळगाव जिल्ह्यातच.

नारायण राणे
काँग्रेसचे प्रचारप्रमुख. लोकसभेत मुलाच्या पराभवामुळे काेकणातील वर्चस्वाला हादरा. आता मुलगा व आपण स्वत: अनुक्रमे कणकवली व कुडाळमधून विधानसभेसाठी रिंगणात. शिवसेना व राष्ट्रवादीने केली चोहोबाजूने कोंडी. एकेकाळचे समर्थकही आता विरोधात. राज्यभर प्रचाराची जबाबदारी असतानाही स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी तळकोकणातच ठोकला तळ. पक्षाच्या विजयापेक्षा स्वत:चा विजय महत्त्वाचा.

छगन भुजबळ
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते, ओबीसीचेही नेतृत्व. ‘फ्रायब्रँड’ नेता म्हणूनही ओळख. येवला मतदारसंघातून स्वत: तर नांदगावमधून मुलगा पंकज रिंगणात. लोकसभेत पराभव झाल्याने आता पुन्हा नाशिक जिल्ह्यावर पकड ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. मराठ्यांची नाराजी व जातीपातीचे राजकारण प्रबळ ठरल्याने दगाफटका होण्याची भीती. त्यामुळे काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या तरी सर्व लक्ष मतदारसंघ व नाशिक जिल्ह्यावरच.

प्रचारातील पक्षनिहाय मुद्दे
भाजप : केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकासाला गती मिळेल.
काँग्रेस : मोदी सरकारचे खरे रूप समोर आले. आता पुन्हा त्यांच्याकडेच सत्ता देणार का?
राष्ट्रवादी : प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे काँग्रेस-भाजपचे प्रयत्न.
शिवसेना : मराठी विरुद्ध गुजराती अस्मिता, भाजपने पाठीत खंजीर खुपसला.
मनसे : राष्ट्रीय पक्षांनी राज्यात लुडबूड करू नये. आम्हीही लोकसभा लढवणार नाही.

आरोप-प्रत्यारोप
अजित पवार : ‘गेली चार वर्षे संथ गतीने कारभार करणा-या पृथ्वीराज चव्हाणांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची आता इच्छा नाही.
प्रत्त्युत्तर - पृथ्वीराज चव्हाण : सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा-या फाइलवर मी सही करीन या धास्तीनेच आघाडी तोडली. वादग्रस्त भाषा करणा-यांच्या सोबत चार वर्षे बसावे लागले, याची खंत.
शरद पवार : पाकिस्तानी सीमेवर आमच्या जवानांवर हल्ले होत असताना पंतप्रधान मात्र प्रचारासाठी फ‍िरत आहेत. शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकवणा-या मोदींना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार काय?
प्रत्त्युत्तर - मोदी : छत्रपतींचा एकही गुण पवारांमध्ये नाही. स्वत: संरक्षणमंत्री असताना एकदा तरी सीमेवर गेले होते का?
उद्धव ठाकरे : ‘महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी दिल्लीहून अफझल खानाची फौज चालून आली आहे.’
प्रत्त्युत्तर - देवेंद्र फडणवीस : ‘केंद्र सरकारमध्ये याच फौजेत तुम्ही कशाला सहभागी झालात?’
राजनाथसिंह : लोकसभा निवडणु कीत आम्हाला सदरा दिलात, आता पायजमा द्या.
प्रत्त्युत्तर - शरद पवार : ‘पायजम्याची गरजच काय? तुमच्याकडे अर्धी चड्डी आहे ना!’

वादात अडकले नेते
नितीन गडकरी : ‘ही निवडणूक हरामाचा माल गरिबांकडे जाण्याची वेळ आहे. येणा-या लक्ष्मीला कोणी नाही म्हणू नका. कोणी पैसे देणार असेल, ते घ्या. मात्र, मतदान करताना लक्षपूर्वक करा.’
आर. आर. पाटील : ‘मनसे उमेदवाराला निवडणुकीनंतर बलात्कार करता आला नसता का?’
अजित पवार : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या गाडीत व अजित पवारांच्या बॅगेत साडेचार लाख रुपये सापडले. पवारांवर गुन्हा.

राहुलची बदलती स्टाइल
नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील प्रभावानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र आपल्या भाषणाची स्टाइल बदलल्याचे दिसले. प्रत्येक ठिकाणच्या सभेत स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले. स्थानिक उमेदवार व नेत्यांनाही व्यासपीठावर स्थान. सभा संपल्यानंतर उपस्थितांशी हस्तांदोलन करत मने जिंकली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र मोजक्याच सभांमध्येही तेच ते रटाळ भाषण वाचून दाखविले. त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नाही.

ता-यांची चमक फ‍िकी
गेल्या काही वर्षांपासून प्रचारासाठी, रोड शोसाठी तारे-तारकांना मोठी मागणी असते. या वेळी मात्र काही अपवाद वगळता राज्यात प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्रींच्या रोड शोंची संख्या गेल्या वेळच्या तुलनेने कमीच होती. त्याऐवजी वृत्तवाहिन्यांवरील व सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातीतून मतदारांची मने जिंकण्याकडे पक्षांचा कल. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’, ‘सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे नाव शिवसेना’, ‘मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी’ यासारख्या कॅचलाइन मतदारांच्या ओठावर.

अशी पाडली मोदींनी छाप
१) मराठवाड्यात गोपीनाथ मुंडेंचे गुणगान करून ओबीसी मतदारांना केले खुश.
२) बाळासाहेबांबाबत आदर असल्याचे सांगून शिवसेनाप्रेमींची नाराजी केली कमी.
३) उद्धव व राज ठाकरेंचा कुठेही नामोल्लेख केला नाही, टीकेला उत्तर नाही.
४) महाराष्ट्र अखंडच राहील, अशी ग्वाही. विदर्भाच्या मुद्द्याला मात्र बगल.
५) अमेरिका, जपान दौ-याचे यशस्वी मार्केटिंग. त्याचे श्रेय मात्र १२५ कोटी जनतेला.