आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politician Daughters To Battle Each Other In Mumbai

वारशासाठी प्रिया-पूनम यांच्यात झुंज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता व काँग्रेसचे पाच वेळा खासदारपद भूषवलेले दिवंगत नेते सुनील दत्त व भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्यांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात यंदा चुरशीची लढत अपेक्षित आहे. विद्यमान खासदार म्हणून केलेल्या कामांच्या भांडवलावर प्रिया दत्त यांची तर मोदी लाट व मनसेच्या मदतीवर भाजपच्या पूनम महाजन यांची मदार असेल. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात यापैकी कोण यशस्वी होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रिया दत्त आणि पूनम महाजन या दोघींमध्ये बरेच साम्य दिसून येते. दोघीही वडिलांचा राजकीय वारसा चालवत असून कुटुंबाची जबाबदारीही चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.प्रियाचा भाऊ संजय दत्त अभिनेता असून अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. पूनमचा भाऊ राहुलही आता अभिनयाच्या क्षेत्रात धडपडत असून तोही अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. प्रतिकूल परिस्थितीत या दोघींनीही आपापल्या भावाला सावरण्याचे काम केले आहे.

सुनील दत्त यांच्या पश्चात दोन वेळा विजयी झालेल्या प्रिया दत्त यांचा मात्र या वेळी पत्ता कापण्याचा विचार काँग्रेस श्रेष्ठी करत होते. त्यांचा जनसंपर्क कमी झाल्याचीही कारणे त्यासाठी दिली जात होती. मात्र श्रेष्ठींकडे राजकीय वजन वापरत प्रिया यांनी तिकीट मिळवलेच. उमेदवारी मिळण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. दुसरीकडे गेल्या वेळप्रमाणेच मनसेने उमेदवार दिल्यास मतविभाजनाचा फायदा काँग्रेसलाच होईल, असे गणितही त्यांनी मांडले होते. मात्र मनसेने यंंदा उमेदवार न दिल्याने काँग्रेस व भाजपशी थेट लढत होईल.

राज ठाकरे मैत्रीला जागले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत प्रमोद महाजन यांच्याशी असलेल्या आपल्या मैत्रीखातर पूनम यांच्याविरोधात दिलेला नाही. त्यामुळे गेल्या वेळप्रमाणे यंदा युतीला मतविभाजनाचा फटका सहन करावा लागणार नाही. महायुतीच्या मतांना मनसेची जोड मिळाल्यास पूनम यांचा विजय सोपा होऊ शकतो. 2009 मध्ये महाजन यांनी घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्या पराभूत झाल्या होत्या.

मतदार नाराज, तरीही प्रियांना विश्वास
प्रिया दत्त यांचा करिष्मा पूर्वीसारखा राहिलेला नाही. भाऊ व अभिनेता संजय दत्तच्या बॉम्बस्फोट प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगितले जाते. संजय दत्तला शिक्षा सुनावल्यानंतर प्रिया यांनी अनेक ठिकाणी भावासाठी शब्द टाकून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. ‘प्रिया दत्त यांनी मतदारांसाठी काहीही केलेले नाही, स्वत:च्या भावाला वाचवण्याचेच काम केले,’ अशा तक्रारी वांद्रे पाली हिल येथील असंख्य मतदारांकडून येत आहेत. मात्र, प्रिया यांना विजयाचा ठाम विश्वास आहे. ‘केवळ मराठीच नव्हे तर सर्व समाजातील नागरिक काँग्रेसच्या बाजूने आहेत. मी मतदारसंघात काम केलेले आहे आणि मतदारांशीही माझा दांडगा संपर्क असल्याने गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईन,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे निकालानंतर या मतदारसंघात कोण बाजी मारतो याकडे राजकीय वर्तुळासह चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे (पूर्व), वांद्रे (पश्चिम) हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात काँग्रेसचे चार व राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आहेत. या मतदारसंघातून भाजप यंदा मनोहर कुंभोज यांना तिकीट देण्याच्या विचारात होता. परंतु दत्त परिवाराशी चांगले संबंध असल्याने कुंभोज यांनी स्वत: तिकीट नाकारले होते. त्यामुळे आता कुंभोज हे पूनम महाजन यांना मदत करतील की दत्त कुटुंबीयांशी असलेल्या मैत्रीला जागतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

लढाईतील अधिक-उणे
प्रिया दत्त यांची बलस्थाने : दोन वेळा विजय, वडील सुनील दत्त यांचा असलेला प्रभाव, निवडणुकीचा अनुभव, प्रचाराला फार पूर्वीच प्रारंभ, काँग्रेसची परंपरागत मुस्लिम आणि ख्रिश्चन व्होट बँक.
उणिवा : मतदार आणि कार्यकर्त्यांपासून दूर, तळागाळातील समाजाकडे दुर्लक्ष, विकासकामांचा अभाव, संजय दत्त प्रकरण.

पूनम महाजनांची बलस्थाने : विरोधी पक्षाची एकमेव उमेदवार, भाजप, शिवसेनेचा पाठिंबा, मनसेनेही उमेदवार न देऊन अप्रत्यक्षरीत्या दिलेला पाठिंबा, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कसलेली कंबर.
उणिवा : मतदारसंघाबाहेरील उमेदवार, कार्यकर्त्यांचे स्वत:चे नेटवर्क कमी, कुंभोजांकडून मदतीबाबत शंका.