मुंबई- चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे यांच्यावर मुंबईत विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आम आदमी पार्टीने चाटे यांना क्रियाशील सदस्यत्व न देता सरळ बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मच्छिंद्र चाटे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. आठवड्यापूर्वी त्यांनी बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी ‘आप’मध्ये दाखल होत त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते. क्रियाशील सदस्यत्व आणि लोकसभा उमेदवारी यासाठी त्यांनी दोन अर्ज राज्य कार्यकारिणीसमोर दाखल केले होते.
‘आप’मध्ये क्रियाशील सदस्यत्वासाठी चार पानांचा अर्ज भरून द्यावा लागतो. त्यात उमेदवारांना आपली माहिती द्यायची असते. चाटे यांनी अर्जासोबत त्यांच्यावर दाखल झालेल्या 354च्या एफआयआरची प्रत जोडली होती. या खटल्याची सध्या भोईवाडा न्यायालयात सुनावणी चालू आहे. चाटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे ‘संबंध’ही जगजाहीर आहेत. या पार्श्वभूमीवर चाटे यांना क्रियाशील सदस्यत्वासाठी छाननी समितीने नापास केले.
त्यामुळे राज्य कार्यकारणीचे सदस्य किंवा लोकसभेची उमेदवारी या गोष्टी तर दूरची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’मधील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केली.
दरम्यान, आम आदमी पक्षाने लोकसभा उमेदवारीसाठी ठेवलेले निकष पूर्ण होत नसल्याचा अंदाज आल्याने चाटे यांनी काही दिवसांपूर्वीच मायावतीच्या बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला असून या पक्षातर्फे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
‘तीन-सी’च्या नियमात अडकले
‘आप’मध्ये आगंतुक आणि वादग्रस्त व्यक्तींसाठी ‘तीन-सी’ निकष पाळला जातो. तीन-सी म्हणजे नॉन करप्टेड, नॉन कम्युनल आणि नॉन क्रिमिनल. यामधील दोन निकषांचे चाटे यांच्यासाठी अडथळे होते. परिणामी चाटे यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवणे पसंत केले, असे ‘आप’चा एक नेता म्हणाला.
बसपाकडून चाटे बीडमधून
दरम्यान, ‘आप’ने उमेदवारी नाकारल्यानंतरही मच्छिंद्र चाटे ईशान्य मुंबई लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षाची इच्छा त्यांनी बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी आहे. आठवड्यात याचा निर्णय होईल, अशी माहिती बसपाचे राज्य अध्यक्ष विलास गरुड यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
तयारी विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे ‘आप’ने उमेदवारी, सदस्यत्व नाकारले