आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी राजकारण पुन्हा रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अाघाडी सरकारच्या कार्यकाळात मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी टंचाईग्रस्त भागाचा दाैरा करून शिवसेना- भाजपने दाेन्ही काँग्रेसविराेधात वातावरण निर्मिती केली हाेती. त्याचा निवडणुकीत फायदाही घेतला. मात्र, राज्यात सरकार बदलले तरी दुष्काळ कायम असून त्यावर राजकारण हाेण्याची पुनरावृत्तीही हाेत अाहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ अाॅगस्टपासून दाैरा जाहीर करताच भाजप नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही तत्परतेनेच त्यांच्या अाधी म्हणजेच १२ अाॅगस्टपासूनच या भागाचा दाैरा करून विराेधकांना उपाययाेजनेचे श्रेय न मिळू देण्याचा प्रयत्न चालवला अाहे. मुंडे १२ ते १७ आॅगस्टदरम्यान मराठवाड्याचा दाैरा करणार अाहेत. रेणापूरपासून त्यांच्या दाैऱ्याची सुरुवात हाेईल. अंबाजोगाई, गंगाखेड, सोनपेठ, पालम, लोहा, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील गावांना भेटी देतील. तसेच बीड जिल्ह्यातील अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेणार अाहेत. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिथेच तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुंडे देणार अाहेत.
मी सरकार, दौरा करणारच : पंकजा मुंडे
दुष्काळावरून दौऱ्यांचे राजकारण सुरू झाल्याचे मुंडे यांना मान्य नाही. ‘माझा दौरा १ महिना अगोदरच ठरला होता. मी बीड, लातूरची पालकमंत्री अाहे. महिनाभरापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थितीविषयी अधिकाऱ्यांबराेबर चर्चा करून दौऱ्याचे निश्चित झाले. प्रत्यक्ष पाहणी झाल्यास त्यामधून उपाययोजना करणे सोपे होईल, असा निष्कर्ष त्यातून निघाला होता. मी सरकार असल्याने परिस्थिती पाहणे हे माझे कर्तव्य आहे. विरोधी पक्षांचेही नेते तेथे जाणार असतील तर आनंद आहे. लोकशाहीत कुठेही जाण्याचा सर्वांना समान हक्क आहेत. मात्र, विराेधी पक्षांकडून याला राजकारण असे नाव देणार असतील तर ते चुकीचे ठरते. काही दिवसांपासून मला ठरवून लक्ष्य करण्यात येत आहे. आपल्या पक्षात महत्त्व वाढवण्यासाठी काही नेते आरडाओरड करत आहेत. मात्र, यामुळे काही फरक पडणार नाही,’ अशा शब्दांत मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

बारा ऑगस्टपासून लोणीकरही दाैऱ्यावर
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकरही १२ ते १४ आॅगस्टदरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययाेजना करता येतील, याची ते चाचपणी करतील. ‘मराठवाड्यात शेतीला थोडे का होईना पाणी आहे. पण, पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट येणार असून त्याला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. जलयुक्त शिवार ही योजना उपयुक्त आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शिवारे भरू शकलेली नाहीत’, असे लोणीकर म्हणाले. ‘मंत्री तसेच विरोधी पक्षांचे नेते यांचा एकाच वेळी दाैरा हा निव्वळ योगायोग समजावा’, असे उत्तरही त्यांनी दिले.