आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Possibility Of Discount For St Bus In New Toll Plaza

विधान परिषद लक्षवेधी: नव्या टोलनाक्यांत एसटीला सूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एसटी महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणीवरील कार्यरत कर्मचा-यांना 70 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ व सेवाकाळाची मर्यादा पाच वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत आणण्याच्या कराराचा अंतिम मसुदा लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली. तसेच नवीन होणा-या टोलनाक्यांवर एसटीला टोलमधून सवलत देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबतची लक्षवेधी उपस्थित करताना धनंजय मुंडे यांनी एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करावा अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, एसटी महामंडळात कनिष्ठ वेतनश्रेणीवर राज्यात 26 हजार 401 कर्मचा-यांना 70 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ व सेवाकाळ पाच वर्षांवरून तीन वर्षे करण्याच्या बाबी महामंडळ आणि मान्यताप्राप्त संघटना यांच्यामध्ये होणा-या करारात समाविष्ट आहेत. हा मसुदा लवकरच जाहीर केला जाणार आहे. एसटीला टोलनाक्यावर सवलत मिळेल का, असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्र्यांनी, यापुढे राज्यात होणा-या नवीन टोलनाक्यांमधून एसटी महामंडळाच्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या टोलनाक्यांवरही एसटीला सवलत मिळावी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले. विनायक मेटे, जयप्रकाश छाजेड यांनीही चर्चेत भाग घेतला.

माध्यमिकसाठी पदवीधर शिक्षक अनिवार्य : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंर्तगत प्राथमिक शिक्षण पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. सध्या शिकवत असलेल्या शिक्षकांनी 31 मार्च 2015 पर्यंत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधान परिषदेत सांगितले.

रामनाथ मोते यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दर्डा यांनी सांगितले की, शिक्षणाचा दर्जा व अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. केंद्राने यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषदेस शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. नव्या बदलानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांची अर्हता बारावी डीएड ठेवली असून नवीन शिक्षकांना पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे. शिक्षकांनी शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे.


स्कूलबसचा आढावा दर तीन महिन्यांनी घेणार : देवकर

मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये याकडे शासनाचे लक्ष असून राज्यातील स्कूल बसेसमध्ये देण्यात येणा-या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी विधान परिषदेत दिली. स्कूलबसचा प्रश्न नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. लक्षवेधीला उत्तर देताना परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, राज्यात परवानाप्राप्त बसेसची एकूण संख्या 13889 असून त्यापैकी शाळेच्या मालकीच्या 5806 व करारावरील परवाना प्राप्त 8083 बसेस आहेत. तपासणीत स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणा-या 1210 बसेस दोषी आढळल्या. स्कूल बसच्या सुरक्षांबाबत बस एजन्सी आणि शाळांचे शिबिर घेण्यात येईल.