आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Possibility Of Increasing Drought Hit Villages Khadse

राज्यात दुष्काळी गावांची संख्या वाढू शकते : खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सद्य:स्थितीत राज्यातील १४ हजार ७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी पीक कापणीच्या अंदाजानंतर या गावांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुष्काळग्रस्त गावांची सुधारित यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून मदत मागितली जाईल. या सुधारित यादीत काही गावांची नावे वाढतील तर काही रद्दही होऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘दुष्काळ जाहीर केलेल्या गावांची आणेवारी १५ सप्टेंबरपूर्वीची आहे. त्यानंतर पाऊस झाला खरा, परंतु तोपर्यंत सोयाबीन, सूर्यफूल अशी पिके संपली होती. कापसासारख्या पिकांना या पावसाचा फायदा झाला, परंतु अशी गावे फारच कमी होती. दुष्काळ जाहीर करण्याकरिता केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आणेवारी घोषित करणे आवश्यक होते. त्यानुसार आणेवारी काढून १४७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. परंतु यात वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरला पीक कापणीचा अंदाज घेतला जाईल. अखेरच्या टप्प्यातील पावसामुळे काही गावांत पीक आले असले तरी काही गावात नुकसानही झाले. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होऊ शकेल. तसेच ज्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे त्या गावात पीक कापणीचा अंदाज चांगला असेल तर अशा गावांची नावे रद्दही होतील,’ असेही खडसे म्हणाले.

वर्षपूर्तीलाही शिवसेना आमच्यासोबतच असेल
आमचे सरकार लवकरच एक वर्ष पूर्ण करत आहे. आमचे सहकारी शिवसेनेच्या मंत्र्यांना एक वर्ष पूर्ण झाले नसले तरी ते आमच्यासोबत सत्तेत आहेत. त्यांच्या मंत्र्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. उद्योगमंत्र्यांनी राज्यात उद्योगवाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत. राज्याच्या सर्व निर्णयात ते सहभागी असल्याने सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ते नक्कीच सहभागी होतील, असा विश्वास महसूल मंत्री खडसेंनी बोलून दाखवला.