आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीवरून शिवसेना-भाजपत पोस्टरवाॅर! सोशल मीडियावरूनही शिवसेनेचा हल्लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटाबंदीवरून सध्या भाजप व शिवसेनेत जोरदार वाद सुरू असून आता हा वाद पोस्टरवाॅरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केविलवाणा आक्रोश सुरू आहे. शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे शिवसेनेकडून पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याला भाजपकडून शिवसेना भवनासमोरच पोस्टर लावून उत्तर देण्यात आले. काळ्या पैशांचा खात्मा हेच अच्छे दिन असल्याचे भाजपचे पोस्टर असून यात पंतप्रधान मोदींना बाळासाहेब आशीर्वाद देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींना शिवसेनेने लक्ष्य केले आहे. निर्णय चांगला असला तरी त्याची तयारी न केल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला आणि शिवसेना जनतेच्या बाजूने असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारण्याची एकही संधी सोडलेली नाही. नोटाबंदीवरून तर पंतप्रधान मोदी व भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडलेली नाही. साहजिकच हा विरोध पोस्टरच्या माध्यमातूनही दिसून आला आहे. बाळासाहेबांचे मोठे चित्र असलेल्या पोस्टरवर मोदींचा केविलवाणा आक्रोश आणि शिवसेनाप्रमुखांची आठवण ही वाक्ये भाजपला झोंबणारी होती. शेवटी भाजपनेही याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पोस्टरवाॅरची जबाबदारी घेताना शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आवाज दिला. काळ्या पैशांविरोधातील लढाईत बाळासाहेबांचा मोदींना आशीर्वाद असल्याने शिवसेनेचे काय मत आहे, याचा भाजपला फरक पडत नाही. मोदी त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत, असेच या पोस्टरमधून सुचवण्यात आले होते. शेवटी पोलिसांनी दोन्ही पोस्टर काढून टाकले.
सोशल मीडियावरूनही शिवसेनेचा हल्लाबोल
लाड यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून पोस्टर लावताच शिवसेनेकडून सोशल मीडियावरूनही भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. नोटाबंदीच्या निर्णयावरून सर्वसामान्यांची बाजू घेताना मोदींचा निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यासाठी शिवसेनेची जोरदार धडपड सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जाते.
बातम्या आणखी आहेत...