आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेमुक्त महाराष्ट्र : माेबाइलवर फोटो पाठवूनही करा आता खड्ड्यांची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांच्या देखभालीत होणारा निष्काळजीपणा यामुळे राज्यभरात सामान्य जनतेत आक्रोश आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिकांना खड्ड्यांबाबत मोबाइल फोनवरून फोटो पाठवून तक्रारीची सुविधा देणारी यंत्रणा येत आहे. रिअल टाइम पॉटहोल ट्रॅकिंग असे या यंत्रणेचे नाव असून, यात तक्रारीनंतर दोन ते तीन दिवसांत खड्डे बुजवण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकण्यात आली आहे. सर्व महापालिका व नगरपालिकांना पुढील वर्षीपासून ही सुविधा अमलात आणण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पावले उचलत अभियंते, कार्यकारी अभियंते यांनी रस्त्यांची पाहणी कधी करावी, दुरुस्ती कधी करावी याचे स्पष्ट आदेशच राज्य सरकारने जारी केले आहेत. शहरांत दाट वस्तीच्या भागात डांबरी रस्त्यांऐवजी काँक्रीट रस्ते बांधावेत, त्यासाठी अद्ययावत सामुग्री वापरावी, तज्ज्ञ सल्लागार नेमावेत असेही आदेशात नमूद आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्यभरातील रस्त्यांचे बांधकाम, देखभाल आणि दुरूस्तीबाबत ४० पानी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी एका शासनादेशाद्वारे त्या जारी केल्या. विभागाचे उपसचिव प्रकाश इंगोले यांची त्यावर स्वाक्षरी आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी राज्य सरकार, महापालिका वा अन्य शासकीय यंत्रणांकडे रस्ते बांधकाम व दुरूस्तीबाबत शास्त्रोक्त व अद्यावत प्रक्रिया निश्चित करणाऱ्या स्पष्ट व सर्वांना लागू होतील अशा मार्गदर्शक सूचना अस्तित्वात नसल्याचे उच्च न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे दिल्लीतील भारतीय रोड काँग्रेस आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक संयुक्त आढावा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. समितीने राज्यातील रस्ते बांधकाम, देखभाल व दुरूस्ती यांचा अभ्यास करून राज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या. राज्य सरकारने या सूचना स्वीकारून त्या राबविण्याचे आदेश दिले आहेत.

दाट वस्तीत काँक्रिट रस्ता
पाण्याचा निचरा होण्यासाठी लागणारी जलनिस्सारण व्यवस्था बऱ्याच रस्त्यांसाठी कायम कार्यरत राहत नाही. त्यामुळे हे रस्ते खराब होतात. हे रस्ते अधिक टिकाऊ होण्यासाठी डांबरीकरणाऐवजी क्राँक्रिटीकरण करण्यात यावे. या बाबत तज्ज्ञ व संस्थांची मदत घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

दुरूस्तीचे वेळापत्रक
काँक्रिट किंवा पातळ पांढरा थर असलेल्या रस्त्यांची दरवर्षी आॅक्टोबरमध्ये दुरुस्ती व्हावी. गरजेनुसार नोव्हेंबर व मार्च, एप्रिलमध्येही करावी. डांबरी किंवा पेव्हर ब्लाॅक रस्त्याची दरवर्षी आॅगस्ट, नोव्हेंबर आणि मार्च व एप्रिलमध्ये गरजेनुसार करावी. दगड, खडीचे रस्त्यांची एप्रिल ते आॅक्टोबरपर्यंत दुरूस्ती असावी. मुरूम रस्त्यांची वर्षभर देखभाल आवश्यक राहील.

रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टिम
- खड्डे भरण्याचे कामकाज पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने व जबाबदारीने होण्यासाठी २९१७ पासून ही सिस्टिम पालिकांना अंमलात आणावी लागेल.
- पालिका यासंबंधीचे एक अॅप विकसित करतील. शहरवासीय अॅप डाऊनलोड करून मोबाइलवर खड्ड्यांचे फोटो त्यावर टाकू शकतील.
- अक्षांश-रेखांशाची अचूक गणना करणारे हे अॅप नंतर जीपीएस-जीआयएस यंत्रणांच्या मदतीने या खड्ड्यांची जागा अचूकपणे शोधून काढेल.
- संबंधित उपअभियंता वा कनिष्ठ अभियंत्याकडे हे फोटो अॅपवरूनच तत्काळ पाठवले जातील.
- पुढील २४ ते ४८ तासांत खड्डा दुरूस्त केल्याचे छायाचित्र संबंधित अभियंत्याला या अॅपवर टाकणे बंधनकारक असेल.
बातम्या आणखी आहेत...