आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prakash Ambedkar Banned Peopls Education Socity Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकाश आंबेडकर यांना 'पीईएस' प्रवेशास मज्जाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी नेमणूक झालेले प्रकाश आंबेडकर यांना शुक्रवारी ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी संस्थेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे गोंधळ झाल्याने पोलिसांनी आंबेडकर समर्थकांवर लाठीमार केला. यात 50 जण जखमी झाले असून 6 गंभीर आहेत. दरम्यान, पोलिसांनी माजी विश्वस्तांना मदत केल्याचा आरोप आंबेडकर यांनी या वेळी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे मुंबईत सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज चालवण्यात येते. या सोसायटीवर गेली अनेक वर्षे डॉ. आंबेडकरांच्या वारसांना स्थान देण्यात आले नव्हते. 3 मे रोजी धर्मादाय आयुक्तांनी गंगाधर पानतावणे, प्रीतमकुमार शेगावकर, गांगुर्डे आदी विश्वस्तांची निवड अवैध घोषित करून प्रकाश आंबेडकर यांना विश्वस्तपदी नेमण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शुक्रवारी समर्थकांसह सिद्धार्थ कॉलेजमधील कार्यालयात गेले. मात्र तेथे त्यांना मज्जाव करण्यात आला. दिल्ली उच्च न्यायालयाने पी.ई. एस सोसायटीच्या सध्याच्या विश्वस्तांची निवड अवैध ठरवून नवा विश्वस्त निवडावा असा आदेश धर्मादाय आयुक्तांना दिला होता. त्यानुसार 3 मे रोजी आपली निवड झाल्याचे आंबेडकर म्हणाले. सध्या वैध विश्वस्त म्हणून एम. एस. मोरे, एस. पी. गायकवाड आणि बिहारमधील प्रा. चौबे काम करीत आहेत. अन्य सर्व विश्वस्त अवैध आहेत, असे त्यांनी नमूद केले. शुक्रवारी कार्यालयात जाताना माजी विश्वस्तांनी सशस्त्र गुंडांमार्फत आपल्याला अडवल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी सिद्धार्थ कॉलेजसमोर उभ्या समर्थकांवर लाठीमार केल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात अवैध विश्वस्तांनाच पोलिसांनी मदत केल्याचे ते म्हणाले.
ही तर संघर्षाची नांदी
आनंदराज आंबेडकर यांनी वर्षभरापूर्वी पेटवलेले इंदू मीलचे आंदोलन आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्वासाठी केलेला प्रयत्न म्हणजे दलित चळवळीतील संघर्षाची नांदी आहे. इंदू मील प्रकरण आणि पी. ई. चा संघर्ष हा दलितांच्या ध्रुवीकरणाचा आरंभबिंदू असल्याचे मानले जात आहे.
बोगस ट्रस्टींना सत्ताधा-यांचे पाठबळ
पी. ई. सोसायटीचा कारभार सुधारला तर दलितांची शैक्षणिक चळवळ पुन्हा उभी राहू शकते. तसे झाल्यास दलितांच्या राजकीय ताकदीमध्ये वाढ होईल. नेमके तेच सत्ताधा-यांना नको आहे. म्हणून बळाने बोगस ट्रस्टींना सत्ताधारी संरक्षण देत आहेत.
भीमराव आंबेडकर, (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू)
संसदेत जाणारे राजकारणी सापडले भ्रष्टाचाराच्या गर्तेत - अँड. प्रकाश आंबेडकर
हल्ल्याच्या निषेधार्थ पीईएस परिसर बंद
पीईएस परिसरात जमावबंदी आदेशास खंडपीठात आव्हान