आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीच्या पाठीशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. आंबेडकर यांनी रविवारी पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याचे संकेतच दिले होते.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चढाओढ लागली होती. त्यात प्रकाश आंबेडकर गटाला आपल्याकडे वळवून सध्या तरी राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसते. तसेच रिपाइंच्या खोब्रागडे गटाशी आणि गंगाधर गाडे यांच्याशी राष्ट्रवादी चर्चा करत असून त्यांचाही पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा पिचड यांनी व्यक्त केली. ठाण्यामध्ये कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांच्याशी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चर्चा केली असून त्यांनीही आपला पाठिंबा राष्ट्रवादीला जाहीर केला असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या राज्य निवड मंडळाची बैठक सोमवारी पार पडली त्यामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या दोन विभागांच्या स्थानिक नेत्यांशी पिचड व अजित पवार यांनी चर्चा केली. अमरावती, सोलापूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड सोडून इतर ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे.
पक्षाचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांची नाराजीही दूर केल्याचे पिचड यांनी सांगितले. डावखरे यांना नागपूर विभागाचा निवडणूक प्रभारी बनवल्याने ते नाराज होते.
राष्ट्रवादीची खेचाखेची
जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नेत्याला पक्षाकडे वळवण्यात यश मिळवले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा 19 नोव्हेंबर रोजी पक्षात प्रवेश करणार असल्याचे मधुकर पिचड यांनी जाहीर केले. तसेच काँग्रेसचे माजी मंत्री आणि नंतर भाजपमध्ये गेलेले मुंडे समर्थक तुकाराम तिगोडे यांनाही सातारा येथे राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार आहे. काँग्रेसचे कोकणातील नेते पुष्पसेन सावंत राष्ट्रवादीमध्ये सामील होणार असल्याचेही पिचड यांनी जाहीर केले.