आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Ammbedkar On Comment Congress & Rashtrawadi

दलित जनता शिवसेना-भाजपला मतदान करू शकते- प्रकाश आंबेडकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: रामदास आठवले धनुष्यबाण आणि कमळाच्या वाटेवर गेल्यानंतर दलित मतांसाठी अन्य दलित नेत्यांवर अवलंबून असलेल्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांनीही झटका दिला आहे. 18 तारखेपर्यंत आघाडीत सामील करून योग्य जागावाटप न केल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला देताना दलित जनता शिवसेना-भाजपला मतदान करू शकते, अशी धमकीही दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची भेट घेऊन आघाडीत सामील होण्याच्या दृष्टीने चर्चा केली. काँग्रेसबरोबर त्यांनी चर्चा केली होती, परंतु त्या चर्चेतून काही हाती न लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
मधुकर पिचड यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसने दलितांना नेहमी निवडणुकीपुरते वापरल्याची भावना सर्वच दलित नेत्यांमध्ये आहे. आम्ही शिवसेना-भाजपबरोबर जाणार नाही. त्यामुळे ते आम्हाला गृहीत धरीत आहेत जे चुकीचे आहे. आम्ही आमच्या ताकदीनुसार योग्य जागांची मागणी करीत आहोत. आम्हाला पाहिजे तितक्या जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण समितीबरोबर आम्ही आघाडी केली असल्याने नांदेड आणि अकोला येथे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मुंबईतही स्वबळावर लढण्याची आमची ताकद असून सर्व जागा आम्ही लढवू शकतो. इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याची घोषणा काँग्रेसने केली. यामागे त्यांचा उद्देश दलित मते प्राप्त करण्याचा आहे. परंतु दलित जनता खुळी नाही. ती शिवसेना-भाजपलाही मतदान करू शकते हे काँग्रेसने लक्षात ठेवावे.