आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणी अनाथ कसे? प्राण्यांच्या अनाथालयाबाबत डॉ. आमटेंना नोटिस, दिल्ली दरबारी गेला वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा- भामरागड येथे प्राण्याचे चालवत असलेल्या प्राण्याच्या अनाथालयाबाबत केंद्र सरकारच्या वन विभागाने आक्षेप घेत नोटिस बजावली आहे. प्राणी मूळात हे भटके असतात प्राण्याचे अनाथालय कसे असू शकते असा सवाल वन विभागाने आमटे यांना विचारला आहे. तुम्ही ज्या प्राण्यांचा सांभाळ करता ते बेकायदेशीर आहे. प्राण्यांचे अनाथालय बंद करा, प्राण्यांना जंगलात सोडा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असा इशाराही वनविभागाने दिला आहे. दरम्यान, प्रकाश आमटे हे आज दिल्लीत वन्यजीव समितीपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी आपली भूमिका मांडली. जखमी प्राण्यांचे जीव वाचावेत याच उद्देशाने हे अनाथालय आपण सुरु केल्याचे आमटेंनी या समितीपुढे सांगितले आहे.
 
काय आहे वाद-
 
- डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा- भामरागड येथे भागात आदिवासींची सेवा करतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
- हा भाग आदिवासी बहुल आहे. शिकारीवर जगणारा आदिवासी मिळालेला कुठलाही प्राणी भाजून - शिजवून खात असे. 
आदिवासी जमात परंपरेनुसार प्राण्यांची शिकार करतात. या शिकारीदरम्यान काही पशू, प्राणी मारले जातात तर अनेक जखमी होतात.
- पोट भरण्यासाठी मारलेल्या या प्राण्यांच्या पिल्लांचे अस्तित्त्व धोक्यात यायचे. जखमी प्राणी व मारलेल्या प्राण्यांची पिल्ले अन्नाअभावी मृत पडायचे.
- या अनुभवातून डॉ. आमटे दाम्पत्याने प्राण्यांचेही पितृत्व स्वीकारले. जखमी प्राण्यांचे अनाथालय उभारले. आज तेथे शंभरावर प्राणी येथे आहेत.
- पर्यटक व हेमलकसाला भेट देणारे लोक या प्राण्याच्या अनाथालयातील प्राण्यांसोबत फोटो काढायचे. अनेकदा आमटे दाम्पत्याच्या अंगा-खांद्यावर प्राण्यांना व त्यांच्या छोट्या पिल्लांना खेळताना पाहिले आहे. 
- पर्यटकांनी काढलेले हे फोटो अलीकडच्या सोशल मिडियातील काळात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातून काही प्रमाणात चुकीचा संदेश जात होता. वनविभागाच्या लक्षात ही बाब आणून देताच त्यांनी आमटे यांना नोटिस धाडल्या व प्राण्यांचे अनाथालय बंद करण्याचे फर्माण सोडले.
- त्यावर आपण फक्त प्राण्यांची लहान पिल्ले (ज्या प्राण्यांना शिकारीत आदिवासीने मारले अशांच पिल्लांना व जखमी पशू, प्राण्यांना अनाथालयात ठेवत असल्याचे सांगितले. तसेच काही प्राण्यांना आम्ही होऊन जंगलात सोडून देतो अशी भूमिका वन्यजीव समितीपुढे मांडली.
- यावर वन्यजीव समितीचे समाधान झाले पण तुम्ही कोणीही प्राण्यांसोबत फोटो काढायचे नाहीत तसेच पर्यटकांनाही काढू दिले जाऊ नयेत, या अटींसह विशेष बाब म्हणून आम्ही हे प्राणी अनाथालय सुरु ठेवण्याबाबत विचार करू शकतो असे वनविभागाने म्हटले आहे.
- या विभागाचे मंत्री हर्षवर्धन यांचीही आमटे यांनी आज भेट घेतली. या प्रकरणात तेथील स्थानिक खासदार व मंत्री हंसराज आहिर यांनी मध्यस्थाची भूमिका मांडली.
 
...तर ते सर्व प्राणी मरतील-
 
- उपचारासाठी, शिकारीतील मरण टाळण्यासाठी आणलेले प्राणी येथे वाढले. त्यांना शिकार कशी करायची, हे माहीत नाही.
- जंगलात वावरण्याची सवय नाही. ते 15 ते 20 वर्षांचे आहेत. अनाथालय बंद केल्यास प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? - आठवडाभरातच ते मरतील. मला ज्या कार्यासाठी सरकारने पद्म पुरस्कार दिला, त्याविरोधात ही भूमिका व धोरण आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार परत करायची भूमिका घ्यावी लागेल, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी म्हटले आहे.
 
असे उभा राहिले प्राण्याचे अनाथालय-
 
- 1974 साली डॉ. प्रकाश आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलात फिरायला जात होते. 
- तेव्हा काही आदिवासी बांधव खाण्यासाठी मारलेले माकड खांद्यावर वाहून गावाकडे चालले होते. 
- त्या मेलेल्या माकडीणीला तिचे जिवंत पिल्लू बिलगून बसलेले होते. त्या आदिवासींना विनंती करून डॉ. प्रकाश यांनी धान्याच्या बदल्यात ते पिल्लू मागून घेतले. 
- अशी या अनाथालयाची सुरुवात एका माकडाच्या पिल्लाने झाली. त्यानंतर लोक बिरादरी प्रकल्पाने अनेक अनाथ प्राण्याच्या पिल्लांना छप्पर दिले आहे.
- बिबटे, साप, अस्वल, हरणे, मगर, तरस, माकड, घुबड, घारी सारखे विविध पक्षी या अनाथालयात आहेत.
- स्वतःच्या किंवा पर्यटकांच्या करमणुकीसाठी नाही तर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी हे अनाथालय उभे केल्याचे आमटे दाम्पत्याचा दावा आहे.
-  त्यातील प्राण्यांवरचे असलेले डॉक्टरांचे प्रेम पाहून आज आदिवासी समाजाला हळूहळू याची जाणीव होते आहे की प्रत्येक वन्यजीव हा आपला शत्रू किंवा आपली शिकार नसते.
- जीव लावला तर कितीही हिंस्र वाटणारा प्राणी ही माणसावर प्रेम करू लागतो, अशी भावना आदिवासीत वाढीस लागल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...