आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या गृहनिर्माण धोरणासाठी प्रकाश मेहता उद्धव ठाकरेंना भेटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याच्या गृहनिर्माण धोरणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर गृहनिर्माण धोरणाचे काम प्रगतिपथावर गेले. नव्या गृहनिर्माण धोरणाचा मसुदा घेऊन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेच्या संमतीनंनतर नवे गृहनिर्माण धोरण तीन सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘माताेश्री’वरील बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता यांनी दुपारी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेऊन नव्या गृहनिर्माण धोरणाबाबत चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदारही उपस्थित होते. या बैठकीत मेहता यांनी प्रस्तावित धोरणाचा मसुदा सादर केला.
या धोरणात हव्या असलेल्या सुधारणांबाबत चर्चा झाली. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याकडे धोरणात लक्ष देण्यात यावे, असे ठरवण्यात आले. धोरण तयारच आहे त्यात आणखी काही गोष्टी जोडण्याच्या सूचना ठाकरे आणि मंत्र्यांनी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राज्याचे गृहनिर्माण धोरण आणि मुंबईचा विकास ’आराखडा राबवताना जनतेचे हित जपले जाण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या तीन आमदारांचा समावेश असलेल्या एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने काम केले आहे. दोन किंवा तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
‘जीएसटी’ कायद्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी केली चर्चा
केंद्र सरकारने जीएसटी विधेयक मंजूर केले असून ३१ ऑगस्टपूर्वी राज्यांनी या विधेयकाला मंजुरी देणे आवश्यक आहे. यासाठी २९ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. शिवसेनेने जीएसटीला विरोध केला होता. अधिवेशनात जीएसटीवर चर्चा होणार आहे. अधिवेशनात शिवसेनेची जीएसटीबाबत काय भूमिका असावी याबाबतही ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांबरोबर चर्चा केली. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर भार न पडता जीएसटीमुळे कसा फायदा होईल, याकडे चर्चेत लक्ष वेधण्यात आले. याच मुद्द्यांवर अधिवेशनात शिवसेनेने भूमिका मांडावी, असे ठरल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...