आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Dhanawade, Mumbai School Cricketer Re Writes Record Of Notout 1009 Runs

Pranav Dhanawade : सचिन, कांबळी नव्‍हे हा आहे शालेय क्रिकेटचा देव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणव धनावडे (फाईल फोटो) - Divya Marathi
प्रणव धनावडे (फाईल फोटो)
मुंबई- कल्याणच्या 15 वर्षीय प्रणव धनावडे या युवा क्रिकेटरने क्रिकेट विश्वात आज नाबाद 1009 धावा करीत अनोखा विश्वविक्रम केला. 327 चेंडूत नाबाद 1009 धावांची धडाकेबाज खेळी साकारताना प्रणवने 129 चौकार व 59 षटकार ठोकत जागतिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान पटकावले. त्याच्या या खेळीमुळे भारतासह जगभरातील क्रिकेट विश्वातून त्याचे कौतूक होत आहे. सर्व बड्या खेळाडूंना मागे प्रणव आज ख-या अर्थाने शालेय क्रिकेटचा देव ठरला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या आंतरशालेय 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत के. सी. गांधी इंग्लिश शाळेसाठी खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या विश्‍वविक्रमाला प्रणवने सोमवारीच गवसणी घातली होती. आज 1 हजार धावा पूर्ण करून तो आणखी एक पाऊल पुढे गेला. कल्याणच्या कॉर्पोरेशन ग्राऊंडमध्ये आर्य गुरुकुल इंग्लिश शाळेविरुद्ध खेळताना त्याने ही ऐतिहासिक खेळी केली आहे. प्रणवच्या 1 हजार धावा पूर्ण होताच त्याच्या के. सी. गांधी इंग्लिश शाळेने आपला डाव 1465 धावांवर घोषित केला. प्रणवच्या शाळेच्या संघाचाही एका डावात सर्वाधिक 1465 धावा करण्याचाही विक्रम नोंदवला गेला आहे.
क्रिकेट जगताचे लक्ष, ट्विटवर टॉप ट्रेंडिंगमध्ये!
प्रणव धनावडे काल दिवसअखेर 652 धावांवर नाबाद होता. 199 चेंडूचा सामना करताना 652 धडाकेबाज खेळी करताना प्रणवने 78 चौकार तर 30 षटकार ठोकले होते. आज सकाळी त्याने प्रथम 700, 800, 900 व अखेर 1 हजार धावांचा टप्पा क्रमाक्रमाने सहज पार केला. उपहाराला खेळ थांबला तेव्हा प्रणव 921 धावावर नाबाद होता. उपहारानंतर 30 मिनिटांत त्याने एक हजारावी धाव चौकार मारून पूर्ण केली. प्रणवने 327 चेंडूत नाबाद 1009 धावा करताना 129 चौकार तर 59 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 312.38 इतका राहिला. चौकार-षटकारांची तूफान फटकेबाजी करीत केलेल्या विश्वविक्रम खेळीमुळे ट्विटवर #Pranav Dhanawade हा हॅशटॅग भारतात टॉपमध्ये तर जगभरात टॉप 10 मध्ये ट्रेंडिंगमध्ये होता.
शिक्षण व क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार- विनोद तावडे
प्रणव यांच्या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली. प्रणवची कामगिरी उंचावण्यासाठी त्याला मदत म्हणून राज्य सरकारने त्याच्या उर्वरित शिक्षणाची व क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेईल अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. तावडेंनी प्रणवचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने त्याचा भव्य नागरी सत्कार करणार आहे अशी घोषणा महापौरांनी केली. शिवसेनेच्या वतीने प्रणव याला 1 लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे,
प्रणवने कोलिन्सचा 628 धावांचा विश्‍वविक्रम मोडला-
प्रणवने नाबाद 1009 धावा करताना एईजे कोलिन्सच्या नाबाद 628 धावांच्या विश्‍वविक्रमाला मागे टाकले. 1899 मध्ये म्हणजे 117 वर्षापूर्वी क्लार्क हाऊस संघाचे प्रतिनिधित्व करताना एईजे कोलिन्सने नॉर्थ टाऊन हाऊसविरुद्ध 628 धावा फटकावल्या होत्या. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणा-या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीतील पृथ्वी शॉने रिझवीविरुद्ध सेण्ट फ्रान्सिससाठी खेळताना 546 धावांची खेळी केली होती. तसेच अरमान जाफरने रिझवीसाठी खेळताना 498 आणि 473 धावा केल्या होत्या. आता प्रणव धनावडे या सर्वांच्या खूपच पुढे गेला आहे.
प्रणवचे वडील चालवतात रिक्षा, सहाव्या वर्षापासून मैदानात-
प्रणवचे वडील प्रशांत धनावडे हे रिक्षा चालवतात. मात्र त्यांनी प्रणवला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मैदानात उतरवले. 15 वर्षीय प्रणव आता दहावीत आहे. प्रणवला क्रिकेटपट्टू बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या त्याच्या कुटुंबियांना आता त्याला मुंबईकडून खेळताना पाहायचे आहे. इतर क्रिकेटपट्टूप्रमाणेच प्रणवचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न आहे. यासाठी प्रणव मोठी मेहनत घेत आहे तर त्याचे प्रशिक्षक मोबिन शेख त्याला घडविण्याचे काम करीत आहेत.
पुढे वाचा,
- प्रणवने दोनदा रचली पाचशे-पाचशे धावांची भागीदारी...
- जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या रचणारे खेळाडूंची नावे...
- प्रणवबाबत विनोद तावडेंचे टि्वट...