आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बॉम्बस्फोट: लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांची उद्या सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित उद्या  सुटण्याची शक्यता आहे. कर्नल पुरोहित यांना कालच सुप्रीम कोर्टाने 9 वर्षांनी जामीन मंजूर केला. जामीनाची रक्कम 2 लाख रुपये रोख भरल्यानंतर, आज कोर्ट सुटकेचे पत्र देईल, त्यानंतर कर्नल पुरोहित बाहेर येतील.

पुरोहित याबाबत म्हणाले, “मी खूप खूश आहे. मला माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी, माझी लष्करी सेवा आणि दुसरं म्हणजे माझं स्वत:चं कुटुंब, माझी आई, बहीण, बायको, दोन मुलं आणि दोन कुत्री”
 
पुरोहित पुन्हा ड्युटीवर
दरम्यान, कर्नल पुरोहित पुन्हा आर्मीमध्ये रुजु होणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना कोर्टाच्या आदेशाची पत्र लष्कराला पुरवावी लागणार आहे. सप्टेंबर 2008 मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आलं होते. मात्र दोष सिद्ध न झाल्यामुळे , त्यांना आजही 75 टक्के पगार आणि भत्ते मिळतात.
 
मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून देशसेवा
पुरोहित हे 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आले.

मात्र 2008 च्या मालेगाव स्फोटाचे धागेदोरे कर्नल पुरोहितांकडे पोहोचल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. अरबी शिकण्यासाठी ते तिकडे गेले होते. पण ते त्यावेळी मुंबईतील कुलाबा आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कार्यरत होते. त्यामुळे कर्नल पुरोहित हे इथूनच पुन्हा ड्युटी जॉईन करण्याची शक्यता आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत
तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे ते पुन्हा रुजु झाल्यानंतर त्यांची बदली होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांना रुजु करुन घ्यायचं की निलंबितच ठेवायचे, कार्यालयीन कामं सोपवायची की नाही, तसेच त्यांना प्रत्यक्ष लष्करी गणवेश परिधान करु द्यायचा की नाही, असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना आहेत. याबाबतचा निर्णय त्यांचा कमांडिंग ऑफिसर घेतील.
बातम्या आणखी आहेत...