मुंबई - दैनिक‘दिव्य मराठी’चे मुंबईचे डेप्युटी एडिटर प्रशांत पवार यांच्या ‘३१ ऑगस्ट १९५२’ या साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा ‘माध्यम’ संस्थेच्या सहयोगाने प्रकाशन सोहळा मुंबईतील माटुंगा येथील कर्नाटक संघ सभागृहात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘३१ ऑगस्ट १९५२’ भटक्या विमुक्तांचा हुंकार हे पुस्तक म्हणजे प्रशांत पवार यांच्या गेल्या दोन वर्षांतील राज्यात तसेच राज्याबाहेरील भटक्या-विमुक्तांवरील संशोधनावर आधारित लेखांचा संग्रह आहे. ‘पालावरची गोष्ट’ या सदराअंतर्गत हे लेख ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ या पुरवणीत गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते.
या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, साकेत प्रकाशनाचे प्रकाशक बाबा भांड, लेखिका प्रज्ञा दया पवार, अहमदाबाद येथील बुधन थिएटरचे दक्षिण बजरंगे छारा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कवी वैभव छाया हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बुधन थिएटरच्या ‘बुधन बोलता हैं’ या देशभर गाजलेल्या लघुनाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. अहमदाबाद येथील भटक्या विमुक्तांमध्ये गणल्या जाणार्या छारा समाजाच्या तरुणांनी स्थापन केलेल्या बुधन थिएटरचे हे नाटक ज्येष्ठ साहित्यिक महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित आहे.