आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratapsingh Mohite patil Intersted To Contest Loksabha From Rpi Mahayuti

माढ्यात आरपीआयकडून प्रतापसिंह इच्छुक, राष्ट्रवादीवर दबावाचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता असतानाच आता मोहिते-पाटील यांच्या घराण्याकडून दबावाचे राजकारण केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला पक्षातूनच वाढता विरोध पाहून त्यांचे नाव मागे पडण्याची भीतीने त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आपण आरपीआयकडून लोकसभा लढविण्यास तयार असल्याचे सांगत रामदास आठवले यांच्याकडे तिकीट मागितले आहे. रामदास आठवले यांनी प्रतापसिंहांसाठी माढा लोकसभा मतदारसंघ आरपीआयला मिळावा यासाठी महायुतीच्या नेत्यांकडे मागणी लावून धरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत लोकसभा उमेदवारीसाठी वाटमारी सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून सध्या जोरदार खल सुरु आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जवळपास निश्चित केले आहे. मात्र, मोहिते-पाटील यांचे पक्षातंर्गत विरोधक आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील पक्षातील नेत्यांचे मते गृहमंत्री आर आर पाटील यांनी दोन दिवसापूर्वी अजमावली असता मोहिते-पाटलांच्या नावाला बराच विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. हीच बाब संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
संजय शिंदे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे शरद पवारांनी येत्या 22 तारखेला मुंबईत माढा मतदारसंघातील सर्व नेत्यांना मुंबईत पाचारण केले आहे. स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेता व पवार कुटुंबियांशी शिंदेंची जवळीक पाहता विजयसिंहांचा पत्ता कट होण्याची भीती मोहिते-पाटील समर्थकांना आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी महायुतीच्या माध्यमातून प्रतापसिंह पाटील यांचे नाव पुढे करण्यास सुरूवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, महायुतीत ही जागा भाजपकडे आहे. त्यातच महायुतीत सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रीय समाज पक्षाने ही जागा मागितली आहे. राजू शेट्टी व महादेव जानकर या जागेसाठी अडून बसले आहेत. माढा कोणत्याही स्थितीत स्वाभिमानीला मिळेल असे शेट्टी म्हणत आहेत. तर, माढा सोडला नाही तर महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा जानकर यांनी दिला आहे. या दोघांचे कमी म्हणून की काय आरपीआयनेही हा मतदारसंघ आम्हाला सोडावा, अशी मागणी केली आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी पक्षीय पातळीवर अद्याप जाहीर होत नसल्याचे पाहून मोहिते-पाटील समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधून आपण आरपीआयच्या तिकीटावर महायुतीकडून लोकसभा लढविण्यास तयार असल्याचे कळविले आहे. रामदास आठवले यांनीही महायुतीकडे प्रतापसिंहांसाठी ही माढ्याची जागा आरपीआयला सोडावी, अशी जोरकस मागणी केली आहे. मात्र, खरोखरच प्रतापसिंह मोहिते-पाटील निवडणूक लढविणार आहेत की मागील वेळेप्रमाणे दबावाचे राजकारण करण्याच्या स्थितीत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापसिंह मोहिते-पाटील लोकसभा लढविण्यास इच्छुक नाहीत पण राष्ट्रवादीकडून आपले बंधू विजयसिंह यांचे पुढे यावे यासाठी दबावाचे राजकारण करीत आहेत. दबावाच्या राजकारणाला शरद पवार बळी पडत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता हा विषय पक्षाच्या पातळीवर कसा हाताळतात याकडे लक्ष असेल.