आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात दरेकर शिवसेनेच्या तंबूत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका करणारे मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर येत्या आठवडाभरात शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत दरेकर यांनी पक्षत्याग करण्याचे संकेत अगोदरच दिले आहेत. त्यानंतर त्यांनी लगेचच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यामुळे दरेकर शिवसेनेत जाणार अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने दरेकरांना कोणत्याही अटी शर्तीविना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले असून पक्षप्रवेशानंतर योग्य तो सन्मान करू, असे आश्वासन दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे, तर दुसरीकडे भाजपकडूनही दरेकरांना कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने नेमका काय निर्णय घ्यावा याबाबत खुद्द दरेकरच द्विधा मन:स्थितीत असल्याचे कळते आहे.

गिते, पाटीलही दरेकरांच्या संपर्कात
मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेल्या वसंत गितेंनीही आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल मौन बाळगले आहे. सध्या तरी लगेचच कोणत्याही निवडणुका नसल्याने गितेंनी "वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली असून दरेकरांशीही संपर्क कायम ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते आजारी असल्याने आराम करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.