आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नाही; पूनम महाजन यांच्‍या पीए कडून धमक्या: सारंगी महाजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वारसा हक्काने महाजन परिवाराकडे असलेली जमीन प्रवीण महाजन यांना न विचारता ट्रस्टला देण्यात आली असून वारसाहक्काची जमीन माझ्या मुलांना मिळावी म्हणून मी कायदेशीर लढा देत आहे आणि माझ्या मुलांना जमिनीचा हक्क मिळवून देणारच, असा निर्धार करतानाच प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी शनिवारी पुन्हा एकदा केला. उस्मानाबाद येथे जमीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी आलेल्या सारंगी महाजन यांनी जमीन प्रकरणातून अंग काढावे म्हणून पूनम महाजन यांचा पीए धमक्या देत असल्याचा आरोपही केला. 

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सारंगी महाजन यांनी प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. महाजन म्हणाल्या, प्रवीण महाजन जेव्हा पॅरोलवर आले तेव्हा त्यांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनीच हे सांगितले होते. त्यानंतर मी मानवाधिकार आयोगाकडे गेले आणि मी जिंकलेही. राज्य सरकारकडून मला औषधोपचाराचे सात लाख रुपये मिळणार होते. अजूनही ते मिळालेले नाहीत. आर. आर. पाटील गृहमंत्री असतानाच हा निर्णय झाला होता. आता आपले सरकार आहे, तरीही मी पैसे मागण्यासाठी जाणार नाही. कारण मला ठाऊक आहे भाजपवाले मदत करणार नाहीत, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.


जमीन प्रकरणाबाबत बोलताना महाजन म्हणाल्या, प्रमोद महाजन यांनी प्रवीण यांची परवानगी न घेता वारसाहक्काने मिळालेली जमीन तपस्वी ट्रस्टला दिली. माझ्या मुलांना वारसाहक्काच्या जमिनीत वाटा मिळावा म्हणून सहा वर्ष मी लढा देत आहे. मात्र मी यातून मागे हटावे म्हणून मला धमक्या दिल्या जात आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन-तीन वेळा मला धमकी देण्यात आली.  उस्मानाबादमध्ये पाऊल ठेवले तर बघून घेऊ, असे फोनवर धमकावण्यात आले. सुनावणीच्या वेळी गाड्या भरून गुंड आणले जातात. पूनम महाजन यांचा पीए हे सगळे करत असतो. धमकीबाबत मी पोलिसांना कळवले नाही कारण माझ्याकडे त्याबाबत पुरावा नाही. धमक्या दिल्या की मी गप्प बसेन असे त्यांना वाटते. प्रकाश महाजन यांनी खटला मागे घ्यावा म्हणून एक करारपत्र केले. परंतु ते करारपत्र मला मंजूर नाही. कितीही धमक्या आल्या तरी मी गप्प बसणार नाही. या खटल्यात मला माझ्याच कुटुंबियांनी आणि बाहेरच्यांनी जो त्रास दिला तो मी पुस्तक रुपाने बाहेर आणणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

प्रकरण काय?
स्व. प्रमोद महाजन यांनी महाजन कुटुंबीयांची उस्मानाबाद येथील वडिलोपार्जित तीन एकर ३२ गुंठे जमीन तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दान केली. संस्थेने या जमिनीवर महाजन यांचे वडील व्यंकटेश महाजन यांच्या नावे कॉलेज सुरू केले. दान केलेल्या जमिनीत हिस्सा मिळावा यासाठी सारंगी महाजन यांनी ट्रस्टला नोटीस देत उपविभागीय अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावले आहेत. याआधी प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनीही या जमिनीतील हिश्शासाठी ट्रस्टच्या अध्यक्ष व प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन-राव यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्याचीच सुनावणी सध्या सुरू आहे.

 

पोलिसात तक्रार करावी 
पूनम महाजन यांचे गुंड धमक्या देत आहेत, असा सारंगी यांचा आरोप आहे. त्यावर प्रकाश महाजन म्हणाले की, त्यांनी धमक्या देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करावी. ज्या मोबाइल क्रमांकावरून धमक्या आल्या. ते क्रमांक जाहीर करावेत.

बातम्या आणखी आहेत...