आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रौर्याला चाप: प्रीती राठीवर अॅसिड हल्ला करणार्‍या दोषीस फाशीची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महिलांवरील अॅसिड हल्ल्याच्या एका प्रकरणात मुंबईच्या विशेष महिला न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. प्रीती राठी या परिचारिकेवर २०१३ मध्ये अॅसिड हल्ला करणारा २६ वर्षीय आरोपी अंकुरलाल पंवारला गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. अंकुर हा दिल्लीत प्रीतीचा शेजारी होता. तेवीस वर्षीय प्रीतीने लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे पिसाटलेल्या अंकुरने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन अनेक अवयव निकामी झाल्यामुळे जून २०१३ मध्ये प्रीतीचा मृत्यू झाला होता.

विशेष न्यायमूर्ती ए. एस. शेंडे यांनी ही शिक्षा ठोठावली. अॅसिड हल्ला महिलांवरील निर्घृण अत्याचार असून अंकुरने प्रीती राठीवर अचानक हल्ला केलेला नसून तो पूर्वनियोजित होता, असा युक्तिवाद करत सरकारी पक्षाने बुधवारी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याने आरोपीला फाशी शिक्षा द्यावी, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते. अंकुर कुटुंबाच्या रोजीरोटीचा एकमेव स्रोत असल्याने त्याचे वय लक्षात घेता दया दाखवण्याचा बचाव पक्षाच्या वकील अपेक्षा व्होरा यांचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला.

दिल्लीची रहिवासी प्रीती राठी नौदल रुग्णालयात परिचारिका म्हणून करिअर करण्यासाठी २०१३ मध्ये मुंबईत आली होती. कुलाब्याच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती. त्यात प्रीतीचाही समावेश होता. नाेकरीवर रुजू हाेण्यासाठी ती कुटुंबीयांसह गरीबरथ एक्स्प्रेसमधून मुंबईत अाली हाेती. दिल्लीत शेजारी राहणारा अंकुर प्रीतीवर एकतर्फी प्रेम करत हाेता, परंतु प्रीती त्याला प्रतिसाद देत नव्हती. तिचा पाठलाग करत मुंबईत अाला हाेता. प्रीतीचे कुटुंबीय वांद्रे रेल्वेस्थानकावर उतरताच अंकुरने तिच्यावर अॅसिड फेकले. यात प्रीतीच्या डाेळ्याला गंभीर दुखापत झाली हाेती, तिचे नातेवाईकही जखमी झाले हाेते. प्रीतीवर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू होते.नंतर तिला बॉम्बे रुग्णालयात हलवले होते.त्यानंतर ती व्हेंटिलेटरवरच होती. अॅसिडचे काही थेंब तोंडात गेल्याने तिच्या अन्ननलिकेला गंभीर इजा पोहोचली होती. नंतर एकेक अवयवही निकामी हाेत गेल्याने तिचा मृत्यू झाला होता.

लग्नास नकार दिल्याने जळफळाटातून क्रौर्य
प्रीतीने लग्नास नकार दिल्याने तिच्यावर तिला बेसूर करण्याचा तिचे करिअर संपवण्याचा अंकुरचा इरादा होता. नकार दिल्याच्या जळफळाटातूनच अंकुरने तिच्यावर एप्रिल २०१३ रोजी मुंबईत अॅसिड हल्ला केला होता.

१३३२ पानी आरोपपत्र, ९८ साक्षीदारही तपासले
हल्ल्याच्या वेळी अंकुरने तोंड बांधलेले होते. जानेवारी २०१४ मध्ये त्याला दिल्लीत अटक केल्यावर पोलिसांनी एप्रिल २०१४ मध्ये अंकुरविरूद्ध १३३२ पानी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ९८ साक्षीदार होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, एकतर्फी प्रेमातून केला होता अॅसिड हल्‍ला..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...