आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आदर्श’ दडपण्यासाठी दिल्लीहून दबाव, एकनाथ खडसे यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिल्लीहून हायकमांडचा फोन आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आदर्श सोसायटी चौकशी घोटाळ्याबाबतचा अहवाल अधिवेशनात मांडला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. तर ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ आलेला नसल्यामुळे हा अहवाल सभागृहात ठेवण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी अहवाल अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सादर करू असे मला सांगण्यास सांगितले म्हणून मी तसे सांगितले, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खुलाश्यावर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी विनियोजन विधेयकाला मंजुरी घेताना अधिवेशन संपेपर्यंत हा अहवाल मांडण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. हा अहवाल नेमका कधी ठेवणार, याचा सरकारतर्फे खुलासा व्हावा. पवार यांचे उत्तर ही गंभीर बाब आहे. हा सभागृहाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानुसार विधानसभेचे कामकाज तहकूबदेखील करण्यात आले.
अधिवेशनाचे सूप वाजत असताना अखेरच्या क्षणी विरोधकांनी पुन्हा अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अहवालाचा एटीआर आला नसल्याचे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या उत्तराला हरकत घेत खडसे यांनी जर अहवाल सादर करण्यासाठी वेळ लागणार होता, तर सरकारने आश्वासन का दिले, असा सवाल केला.
अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे व विनोद तावडे म्हणाले, केंद्रातील एका बड्या नेत्याची खूर्ची या घोटाळ्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल मांडला नाही. सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याबद्दल
त्यांच्याविरोधात पुढील अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल.