आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prison Employees Gets Salary From Gangsters Claims Mla Anil Gote

तुरुंग कर्मचार्‍यांना गँगस्टर्सकडून पगार, आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘राज्यातील तुरुंगांमध्ये असणारे गँगस्टर्स कारागृह कर्मचार्‍यांना पगार देतात. हा पैसा घेण्यासाठी तुरुंगात कर्मचार्‍यांची रांग लागते’ असा गौप्यस्फोट आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत केला. ‘मला पाच लाख रुपये द्या, मी तुम्हाला येरवडा तुरुंगातून बाहेर पडून दाखवतो’, असेही त्यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली.

येरवडा कारागृहात कैद्यांना मोबाइल पुरवले जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न माधुरी मिसाळ व पंकजा मुंडे-पालवे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील तुरुंगांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी सीसीटीव्ही यंत्रणा व इतर साधनसामग्री खरेदी करण्यासाठी लागणारा निधी गृह विभागाला नागपूर अधिवेशनात देण्यात येईल.

मोबाइल जॅमर्स बसवणार
सध्या मध्यवर्ती कारागृहांत मोबाइल जॅमर्स लावण्यात आले आहेत. त्यांचा परिणाम पाहून सर्वच कारागृहांमध्ये जॅमर्स बसवण्यात येतील. तसेच कारागृहांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाले असून आर्थर रोड, तळोजा व येरवडा कारागृहांत 183 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

संजयला सुविधा नाहीच
येरवडा कारागृहात अभिनेता संजय दत्तला घरचे जेवण येत असल्याची बाब खरी आहे का, असा प्रश्न शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी विचारला. तेव्हा कैद्यांना घरचे जेवण पुरवण्याची तरतूद नाही. त्यामुळे दत्तला अशी सुविधा देण्यात आलेली नसल्याचे गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. तुरुंग नियमावलीतील कालबाह्य तरतुदी बदलणे आणि कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली. गोंदिया, गडचिरोली, वाशीम येथे तुरुंगबांधणीची कामे सुरू असल्याचे ते म्हणाले.