आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैद्यांच्या हाताच्या ठशांचे संगणकीकरण होणार, फरार आरोपींचा शोध घेणेे साेपे जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एखाद्या व्यक्तीच्या हाताचे ठसे संगणकावर दिले जाताच त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होते, त्यामुळे संबंधिताने पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना मिळते, अशा स्वरूपाची दृश्ये चित्रपटांमध्ये दिसून येतात. नेमकी हीच पद्धत राज्यातही राबवण्याचा विचार गृह विभाग करीत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांच्या मदतीने लवकरच कैद्यांच्या हातांच्या ठशांचे संगणकीकरण करण्यास सुरुवात केली जाईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

राज्यात सध्या एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर त्याच्या हाताचे ठसे घेतले जातात, परंतु ते कागदावर असतात. त्याचा काही प्रमाणात वापर होतो. मात्र, कागद हरवल्यानंतर ठसे मिळत नाहीत. त्यामुळे पुन्हा ठसे घ्यावे लागतात. अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदच्या हाताचे ठसे पोलिसांकडे नाहीत ते याच कारणामुळे. ही बाब लक्षात घेऊन आता प्रत्येक आरोपीच्या हाताच्या ठशांचे संगणकीकरण करून ठेवण्यात येणार आहे.

अशी असेल प्रक्रिया
एखाद्या व्यक्तीला गुन्ह्यात अटक केल्यास सर्वप्रथम त्याच्या हाताचे ठसे संगणकावर घेण्यात येतील. तसेच त्याच्या डोळ्याचेही स्कॅनिंग करण्याचा विचार आहे. हाताचे ठसे संगणकावर घेतल्यानंतर त्यात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरण्यात येईल. ही माहिती मुख्य सर्व्हरमध्ये साठवली जाणार असल्याने ती केव्हाही पाहता येणे शक्य होणार आहे. सर्व कैद्यांचे संगणकीकरण झाल्यानंतर सगळ्यांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांमध्ये उपलब्ध होईल. यामुळे भविष्यात एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याची अाधीच्या गुन्हेगारीची ‘कुंडली’च पाेलिसांसमाेर येईल. या यंत्रणेनुसार अन्य राज्यांमध्येही आरोपींच्या हाताच्या ठशांचे संगणकीकरण केल्यास गुन्हेगारांना पकडणे अत्यंत सोपे होणार आहे.

अाराेपींची ‘कुंडली’ एका क्लिकवर कळणार
काही गुन्हेगार एका राज्यात गुन्हे करून इतर राज्यांत फरार हाेतात. तिकडे वेगळ्या गुन्ह्यासाठी त्याला पकडल्यास व त्याच्या हाताचे ठसे संगणकावर अपलोड केल्यास त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची माहिती त्या राज्यातील पोलिसांनाही होईल. तसेच एखादा गुन्हा झाला असल्यास तेथे हाताचे ठसे सापडले तर ते संगणकावर अपलोड केल्यानंतर ती व्यक्ती सराईत गुन्हेगार असेल तर त्याची माहिती लगेचच उपलब्ध होईल. गृह विभागाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून स्वतः मुख्यमंत्रीही संगणकाच्या वापरासाठी आग्रही अाहेत.

फायदा काय?
{ जामीन, पॅरोलवर असलेला कैदी पळून गेला असल्यास पकडणे सोपे.
{ गुन्ह्याच्या ठिकाणी ठसे सापडल्यास आरोपीला अटक करणे सोपे.
{ पोलिस दफ्तरी सर्व कैद्यांचे रेकाॅर्ड मिळणार
बातम्या आणखी आहेत...