आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithiviraj Chavan Not Having Top Gear Navab Malik

पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षात राज्यकारभाराचा टॉप गिअर टाकलाच नाही - नवाब मलिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षात राज्यकारभाराचा टॉप गिअर टाकलाच नाही. त्यामुळे राज्याचा विकास होत असला तरी त्याची गती म्हणावी तेवढी नाही, अशी खोचक टिप्पणी करत राष्‍ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या तीन वर्षांच्या पूर्तीचे बुधवारी वाभाडे काढले. विरोधी पक्षांपाठोपाठ राष्‍ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या टीकेमुळे दोन्ही पक्षांतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून आगामी तीन जिल्हा परिषद तसेच दोन महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणाही मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीला नुकतीच तीन वर्षे झाली. त्याबद्दल स्वपक्षीय काँग्रेसच्या वतीने कौतुकाचे सोहळे पार पडत आहेत. मुख्य विरोधी पक्ष भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांच्या तथाकथित स्वच्छ कारभाराची खिल्ली उडवली असून मुख्यमंत्रीच भ्रष्टाचारावर पांघरूण घालत असल्याचा ठपका ठेवला आहे. तोच धागा पकडत आघाडीतील मित्रपक्ष असणा-या खुद्द राष्‍ट्रवादीनेच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढल्याने दोन्ही पक्षांतील सुंदोपसुंदी स्पष्ट झाली.
‘कँपा कोला’कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे स्वागत करून बेकायदा बांधकामांना राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विरोध असला तरी बांधलेली घरे न पाडता वाचवायला हवीत, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
झेड. पी. स्वबळावर
धुळे, नंदुरबार तसेच अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुका 1 डिसेंबरला तर धुळे, नगर महापालिकेच्या निवडणुका 15 डिसेंबरला होत आहेत. या निवडणुका राष्‍ट्रवादी स्वबळावर लढवणार असून पक्षाला विजयाची खात्री असल्याचा दावा मलिक यांनी केला.
‘ते’ वक्तव्य दुर्दैवी
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, या लता मंगेशकर यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन चांदूरकर यांनी ‘अशांचे पुरस्कार काढून घ्या’, असे खळबळजनक विधान केले होते. केंद्र सरकारने दिलेला कोणताही पुरस्कार एखाद्या पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसतो, असे स्पष्ट करत चांदूरकर यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचे मलिक यांनी सांगितले.
दाभोलकरांपाठोपाठ मोरे
संघ परिवारावर टीका केल्याबद्दल तुकाराम महाराज यांचे वंशज, समाजशास्त्रज्ञ प्रा. सदानंद मोरे (पुणे) यांना धमक्यांचे दूरध्वनी येत आहेत. त्यांचा दाभोलकर होऊ नये यासाठी मोरे यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसने गृहमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. प्रा. मोरे यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
लोकसभेच्या अधिक जागा हा काँग्रेसचा हक्कच : मुख्यमंत्री
नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळवण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार समर्थन केले. तो काँग्रेसचा हक्क असल्याचे त्यांनी भारतीय महिला प्रेसच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. 2009 च्या निवडणुकीचा दाखला त्यांनी या वेळी दिला. काँग्रेसने तेव्हा 26 जागा लढवून 17 जिंकल्या होत्या. तर, राष्‍ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढवून केवळ 8 जागा जिंकू शकली होती. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने 174 तर राष्‍ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.