आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी साटेलाेटे करुन राष्ट्रवादीने ३५ दिवस अाधी पाडले अाघाडी सरकार : चव्‍हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या अट्टहासामुळे काँग्रेससोबत राष्ट्रवादी बुडाली,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या या टीकेचा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी चांगलाच समाचार घेतला. ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीने तत्काळ आमचे अाघाडीचे सरकार ३५ दिवस आधीच पाडले. कारण त्यांचे भाजपशी साटेलोटे असावेत. हे कमी म्हणून की काय भाजप सरकारला पाठिंबा देत जातीयवादी सरकार येण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका राष्ट्रवादीने बजावली,’ असा पलटवारही केला.

प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी चव्हाण यांच्यावर थेट टीका केली हाेती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चव्हाणांवर टीकेची झोड उठवली होती. शुक्रवारी चव्हाणांनी या सर्वांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘सहकारी बँकांना सहकार्य करण्यासाठीच आम्ही काही निर्णय घेतले होते. मात्र राष्ट्रवादीने त्याला राजकीय रंग दिले. राजकीय सूडच जर मला उगवायचा असता तर बुडीत गेलेल्या सहकारी बँकांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश मला देता आला असते. मात्र तसे आम्ही केले नाही,’ असे सांगत अापण त्या वेळी राष्ट्रवादीची पाठराखणच केल्याचे चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

‘भाजपचे सरकार राष्ट्रवादीच्या कृपेनेच वाचले,’ असा थेट आरोप करत चव्हाणांनी यामधील अंतर्गत बाब स्पष्ट करून दाखवली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आयत्या वेळी उमेदवार मागे घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे भाजपच्या सरकारला बळ मिळाल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्याच्या सरकारने दोन वर्षांत काहीच केले नाही याचा राग या समाजाच्या मनात आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा अध्यादेश जारी केला नाही. त्यामुळे समाज चिडला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी मंत्र्यांकडूनच पवारांची चौकशी
सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्याचा िनर्णय राष्ट्रवादीच्याच तत्कालीन गृहमंत्र्यांनी घेतला होता याकडेही चव्हाणांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...