आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रत्यक्ष राजकीय मैदानात कधीच उतरला नव्हता. मात्र आजकाल संघाकरवीच भाजप चालवला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुकाबला थेट संघाशी होणार आहे. म्हणूनच जातीयवाद्यांच्या विषारी जाहिरातबाजीला विकासाच्या योजनांनी प्रत्युत्तर द्या, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले. मुंबईत आयोजित प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव, प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, राज्यमंत्री डी. पी. सावंत, सतेज पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. मात्र, आता जातीयवाद्यांच्या विषारी प्रचारामुळे भारतीय लोकशाही पणाला लागली आहे.
देशाची एकात्मता संपुष्टात आणण्याचे जातीय शक्तीचे प्रयत्न उधळून लावायला हवेत. भाजप-संघ कोणती प्रचार तंत्रे वापरतात, याचा अभ्यास करा. तशी तंत्रे आत्मसात करा. सोशल मीडिया, मार्केटिंग आणि वीअर तंत्राचा अवलंब करून काँग्रेसची प्रचार यंत्रणा प्रभावी करा, अशी हाक चव्हाण यांनी युवक कार्यकर्त्यांना दिली.
जातीय शक्तींना एकाच धर्माचा देश करायचा आहे. त्यासाठी गलिच्छ प्रपोगंडा करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. म्हणूनच देशाने साठ वर्षांत जे कमावले ते गमावण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मागील एक हजार वर्षांत देशाचा जो विकास झाला नाही. तो ‘यूपीए-1’ च्या कार्यकाळात झाला. काँग्रेसने देशाचा केलेला विकास कोणतेही उपकार नाही. विकासाबरोबर काँग्रेसने लोकांना अधिकारही दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळात विरोधकांनी राजकारणच केल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. तर काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यात शासन कमी पडत असल्याची खंत माणिकरावांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.