मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली वर्सोवा -अंधेरी- घाटकोपर या मार्गावरील मुंबई मेट्रो रेल्वे सेवा रविवारी अखेर सुरू झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पहिली मेट्रो ट्रेन रवाना झाली. मेट्रोच्या पहिल्या दिवशीच्या प्रवासात सहा तासांत तब्बल 1 लाख मुंबईकरांनी प्रवास केल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.
मेट्रोच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाचा दिवस हा मुंबई शहरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक अडचणींवर मात करत मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात यश आल्याने खूप समाधान वाटत आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात मेट्रो प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरेल अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, तिकीट दराबाबत रिलायन्स आणि सरकार यांच्यातील वादावर लवकरच तोडगा निघेल. तसेच नवी मुंबई, पुण्यातही लवकरच मेट्रो धावणार अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीरा चव्हाण यांनी या वेळी दिली.
प्रवासाचा वेळ झाला कमी
पूर्वी घाटकोपरवरून अंधेरीला जाण्यासाठी बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने तब्बल एक ते दीड तास लागत होता. मात्र, मेट्रो रेल्वेने केवळ 21 मिनिटांत हे अंतर कापता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. सकाळी साडेपाच ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. सुरुवातीला एका महिन्यासाठी या गाडीचे तिकीट 10 रुपये असेल. मात्र एका महिन्यानंतर प्रवाशांना 10 ते 40 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.