आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना चर्चेत नव्हे, तर राजकारणात रस - पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार घालणार्‍या विरोधकांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी समाचार घेतला. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांना राजकारण करून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यांना चर्चेत रस नाही’, अशी टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

चव्हाण म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनाच्या परंपरेला तडा देत विरोधी पक्षांनी आरोपपत्र सादर केले. खरेतर त्यांच्या प्रश्नांना सभागृहात चर्चेतून उत्तरे मिळाली असती. चार दिवसांचे असल्याने जास्त वे२ळ सकारात्मक कामांसाठी वापरत आला असता. पण, ते विरोधकांना नको आहे. अधिवेशनात 12 विधेयकांवर चर्चा होती. त्यापैकी काही महत्त्वाची होती. मात्र विरोधकांनी भरीव सूचना करण्याऐवजी प्रथेला छेद दिला.

सरकारची आदर्श, चितळे अहवालावर चर्चेची तयारी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन लेखानुदानापर्यंत मर्यादित ठेवून ते काही दिवसांत आटोपते घ्यायचे, हे प्रथमच होत नाही. 1999, 2004 व 2009 मध्ये असेच झाले होते. मात्र विरोधक पहिल्यांदा अधिवेशन गुंडाळले जात असल्याचा कांगावा करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या विधेयकावर चर्चा
सावकार नियमन , ग्रामपंचायत सुधारणा, राज्य पोलिस सुधारणा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा, पुरवणी विनियोजन, लेखानुदान विनियोजन, भारतीय वने सुधारणा, जमीन सुधारणा परियोजना, केंद्रीय शिक्षणाचा अधिकार इत्यादी प्रस्तावित व प्रलंबित विधेयकावर या अधिवेशनात चर्चा होईल.

राज्य मोठे, कर्ज अधिक!
सत्ताधार्‍यांनी राज्याला कर्जाच्या खाईत डुबवले, हा विरोधकांचा प्रचार साफ खोटा आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, जेवढे राज्य मोठे तेवढे कर्ज अधिक असते. हाच नियम मोठ्या देशांबाबतही असून कर्ज हे नेहमी उत्पन्नाच्या मर्यादेत दिले जाते. प्रत्येक राज्यांना कर्जाची मर्यादा असून महाराष्ट्राने अजूनही क्षमतेपेक्षा कमी कर्ज घेतले आहे. कर्ज घेण्याबाबत केंद्र सरकारचे नियम ठरलेले आहेत. ते डावलून कधीही कर्ज दिले जात नाही.