आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan News In Marathi, Chief Minister, Congress, NCP, Divya Marathi

दोन्ही काँग्रेसकडून पाडापाडीचे कारस्थान, पृथ्‍वीराज चव्हाण यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या 13 उमेदवारांना पाडण्याचे काँग्रेसने कारस्थान केले, असे राष्‍ट्रवादीचे म्हणणे असले तरी तसेच कुटिल डावपेच राष्‍ट्रवादी काँग्रेसकडूनही झाले आहेत. आमच्याही कार्यकर्त्यांनी तसे पुरावे पाठवले आहेत. यावर समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होईल, अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष व पदाधिका-यांची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणा-या या बैठकीत लोकसभेत पक्षाची काय स्थिती होती यावर चर्चा झालीच; पण विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
आघाडीचा धर्म दोन्ही काँग्रेसकडून पाळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. राष्‍ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करणा-या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांना काँग्रेसकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन मार्ग काढला जाईल. मात्र याचा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्‍ट्रवादीच्या आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आमची आघाडी यापुढेही कायम राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे किमान विधानसभा निवडणुकीत तरी यश मिळावे यासाठी राष्‍ट्रवादीप्रमाणे काँग्रेसही तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत मागे काय स्थिती होती आणि आता काय तयारी करायला हवी, याची या बैठकीत चर्चा झाली. विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांत निरीक्षक पाठवून आढावा घेण्यात येणार आहे. 288 पैकी सर्वच मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार नसले तरी आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता काय करायला हवे, याचा अहवाल निरीक्षक देणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मोदींचा नकारात्मक प्रचार
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नकारात्मक प्रचार केला. पंतप्रधानपदाच्या उमेदवारांकडून अशी अपेक्षा नव्हती. असा प्रचार अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनीही केला नव्हता. मात्र विरोधी पक्षांचा हा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी
काँग्रेस आघाडीलाही आता तयारी करायला हवी. गेल्या 15 वर्षांतील राज्यातील आमची चांगली कामे लोकांसमोर ठेवायला लागणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

किती जागा जिंकणार, माहीत नाही!
आघाडीला 2009 च्या निवडणुकीत 25 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 17, तर राष्‍ट्रवादीने जागा जिंकल्या होत्या. या वेळी किती जागा जिंकणार, असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी माहीत नाही, असे उत्तर दिले. पण प्रसारमाध्यमे सांगत आहेत त्यापेक्षा जास्त जागा आघाडी जिंकेल, असा टोला मारण्यास ते विसरले नाहीत.