मुंबई - स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे ६८ वर्षीय पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील महिलांनी सर्वाधिक आकर्षक मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. दुसरा क्रमांक मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्राप्त झालेला आहे. अॅशलेमॅडिसन या डेटिंग वेबसाइटने सर्वेक्षण केले असून त्यात या गोष्टी समोर आल्या.
वागणे, बोलणे, चालणे, हसणे, उंची आणि प्रतिमा या आघाड्यांवर मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील उमेदवारांमधून आकर्षक मुख्यमंत्री निवडण्यासाठी हा सर्व्हे केल्याची माहिती अॅशलेमॅडिसन वेबसाइटचे युरोपियन कम्युनिकेशन डायरेक्टर क्रिस्टोफर क्रीमर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
मुंबईत आलेल्या क्रीमर यांनी याबाबत माहिती दिली. ‘अनेक देशांत आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांबाबत सर्व्हे करीत आलो आहोत. महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या या नेत्यांबाबत महिलांची काय मते आहेत आणि त्या कोणाला आकर्षक समजतात यासाठी आम्ही गंमत म्हणून एक सर्वेक्षण केले.
राज ठाकरे दुस-या क्रमांकावर
हा सर्व्हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर येथील १५ ते ४० वयोगटातील १२ हजार ७५ महिलांशी बोलून करण्यात आला. इंग्रजी जाणणा-या आणि डेटिंग साइटशी संबंधित अशा या महिला होत्या, असे क्रीमर यांनी सांगितले. अनेक महिलांना चव्हाण यांची चाल, पेहराव, प्रतिमा आणि बोलणे सर्वाधिक आवडले. राज ठाकरे शरीरयष्टीच्या बाबतीत चव्हाणांपेक्षा कमी ठरल्याने त्यांना दुसरा क्रमांक, तर उद्धव ठाकरे आवाजामुळे तिस-या स्थानावर गेले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.