आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींनी चूक केली असे वाटते काय? मुख्‍यमंत्री चव्‍हाण यांचा मोदींना प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘महात्मा गांधी यांनी संपूर्ण विचार करूनच देशाच्या पहिल्या पंतप्रधानपदी पंडित नेहरूंची निवड केली. त्यांच्या निवडीमागे चूक झाली असे मोदींना वाटते काय?’ असा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी उपस्थित केला. मोदी हे राजकारणाचे पुनर्विश्लेषण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिवाळीनिमित्त त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. या वेळी त्यांनी मोदींपासून शरद पवार व इतर सर्वच विषयांचा ऊहापोह केला.

‘देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल झाले असते तर?’ असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला होता. त्यावर ते म्हणाले, जुन्या राजकीय निर्णयाचे पुनर्विश्लेषण करण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत. महात्मा गांधींच्या निर्णयाबाबत जनता काय समजायचे ते समजेल, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

जागा वाटप दिल्लीतच
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून जुंपली आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवू इच्छिते हे खरे आहे का? यावर मुख्यमंत्री म्हणाले की, कोणीही कोणाच्या दारात जागा मागण्यासाठी गेलेले नाही. जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतच होईल. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी यावर बोलणे योग्य नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध लढत आहोत. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्रच लढू.

आघाडी सरकार ही चिंता

‘कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने आघाडी सरकार चालवणे भाग पडत आहे. एखाद-दुसरे राज्य सोडले तर कोणत्याही राज्यात आणि केंद्रातही एका पक्षाला बहुमत नाही. खरे तर आघाडी सरकार चालवणे ही फार चिंतेची बाब आहे. आघाडी सरकार जास्त काळ चालत नाही. त्यामुळे एका पक्षाला बहुमत मिळणे आवश्यक आहे. परंतु तसे चित्र दिसत नाही,’ अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

सध्या स्वबळ नाहीच

‘काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळेल का? किंवा काँग्रेस स्वबळावर लढणार?’ या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, पुढे काय होईल ते सांगता येणे अवघड आहे. काँग्रेसची ताकद वाढल्यास स्वबळावर लढणे शक्य होईल परंतु सध्या आघाडी सरकारशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांची जबाबदारी वाढली

माध्यमांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. प्रिंट मीडिया संपेल असे बोलले जात आहे, परंतु मला तसे वाटत नाही. व्हीसीआर आला तेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात जाणार नाही असे म्हटले जात होते. परंतु प्रेक्षक आजही मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमांना फायदाच होईल, असे त्यांनी आवर्जून नूमद केले.

पवारांकडे लक्ष द्यायचे नाही... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..