आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Urges Traders To Stop Misleading People Over LBT

एलबीटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना हवा सर्वच काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एलबीटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही व्यापार्‍यांनी काही ठिकाणी बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. एलबीटीबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असून काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांमध्ये जागरूकता आणावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, आमदार व एलबीटी लागू झालेल्या महापालिकांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

मुंबईमध्ये हा कर लागू करण्यापूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यावर चर्चा करून संमत केला जाईल. पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे. या करामुळे राज्य सरकारला नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांना फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पटवून दिल्याची माहिती चांदूरकर यांनी दिली. तसेच ‘इन्स्पेक्टर राज येणार’, असा चुकीचा प्रचार होत असून कारवाई करण्याचे अधिकार सचिव श्रेणीच्या व्यक्तीकडेच दिल्याचे ते म्हणाले.

एलबीटीबाबत व्यापार्‍यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी केल्या. एलबीटीमध्ये सुधारणा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या समितीमध्ये व्यापार्‍यांचे प्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक यांचा समावेश करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे समजते.