आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: फडणवीस सरकारची कोटींची उड्डाणे, आघाडी सरकारपेक्षा पाचपट हवाई खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या दाेन वर्षांत फडणवीस सरकारमधील प्रमुख व्यक्तींनी खासगी विमानाने हवाई प्रवासासाठी केलेल्या खर्चाचा अाकडा तब्बल १४ काेटींपर्यंत जाऊन पाेहाेचला अाहे. त्याउलट काँग्रेस आघाडी सरकारचा २०१४ वर्षाअखेर फक्त ३ काेटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारच्या अधिकृत अाकडेवारीवरून समाेर अाली अाहे.
 
दहा पटींनी वाढलेल्या या खर्चामागचे मुख्य कारण म्हणजे  मुख्यमंत्री व राज्यपालांसह भाजपचे सर्व केंद्रीय तसेच राज्यातील प्रमुख मंत्री तसेच राष्ट्रीय पदाधिकारी खासगी विमानांनीच  प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याचे आढळून आले. सातत्याने प्रवास करणाऱ्या राज्यातील मंत्र्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, राम शिंदे, विनोद तावडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
राज्य सरकारची स्वत:ची दोन विमाने व दोन हेलिकाॅप्टर्स आहेत. मात्र यापैकी एक विमान व हेलिकाॅप्टर खराब झाले असून ती पडून आहेत. या विमानांचा दुरुस्तीचा खर्च एवढा प्रचंड असून की त्या खर्चात नवीन विमाने येऊ शकतात. यामुळे नवीन विमाने घेण्याच्या भानगडीत न पडता भाजप सरकारने खासगी विमान भाड्याने घेण्यालाच प्राधान्य दिले अाहे.
 
गरजेनुसार २० आसनी विमानांपासून ते हेलिकाॅप्टर्स भाड्याने घेतली जात आहेत. मागील सरकारमध्ये विशेषत: पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात अगदी महत्त्वाच्या कामांसाठीच विमान प्रवास करण्यावर सरकारचा भर राहिला होता. मात्र भाजपचे सरकार ‘वेगवान’ असल्याने ते विमानांनीच प्रवासाला प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

याआधीच्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री व राज्यपालांना वेळेत पाेहोचण्यासाठी खासगी विमाने मिळत असत. मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी तसेच राज्याचे मंत्री विकासकामे मार्गी लावण्याच्या नावाखाली खासगी विमानांनी प्रवास करत आहेत. मध्यंतरी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन मुंबईत आल्या होत्या. त्यांचे माहेर हे चिपळूणचे. तेथे एका कार्यक्रमासाठी त्यांना जायचे होते. त्यासाठी त्यांना राज्य सरकारने खासगी विमानाच्या प्रवासाची व्यवस्था करून दिली होती.  

मुख्यमंत्री फडणवीस तसेच अर्थमंत्री मुनगंटीवार हे नागपूर व चंद्रपूरला वरचेवर जात असतात. दोघांचेही मतदारसंघ व मूळ गावे ही विदर्भातील असल्याने खासगी विमानांचा आधार घेऊन ते झटपट प्रवास करण्यावरच भर देतात. विकास कामांची उद‌्घाटन साेहळे तसेच कार्यक्रम आटोपले की याच विमानांनी परतीचा प्रवास होत असल्याचे दिसते.  
 
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व सुधाकर नाईक हे रेल्वे तसेच सर्व्हिस फ्लाइटने प्रवास करायचे. यानिमित्ताने अामदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बातचीत करून प्रवास व्हायचा. सुधाकर नाईक हे वर्ध्यापर्यंत रेल्वेने जाऊन तेथून गाडीने आपल्या गावी पुसदला जायचे. अशा प्रवासाने राज्यातील परिस्थितीचीही माहिती मिळत असल्याचा त्यांचा अनुभव होता.  

सरकारच्या धोरणाचा भाग  
फडणवीस सरकार सत्तेत अाल्यापासून विविध योजनांचा धडाका लावण्यात आला असून त्यात सिंचनाच्या विविध योजनांचा मोठा सहभाग आहे. जलस्वराज्य ही स्वत: मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या कामांना सुरुवात करण्यापासून ते पूर्ण करण्यासाठी जलदगतीने हालचाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अर्थ, शिक्षण, महिला बालविकास, जलसंपदा, जलसंधारण, शिक्षणाच्या योजना मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री विमानाने जात असल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे संबंधित विभागांचे म्हणणे आहे.  

वादग्रस्त कंपनीचे हेलिकाॅप्टर भाड्याने  
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी भाडेतत्त्वावर हवाई प्रवासाकरिता नुकतीच राज्य सरकारने भाड्याने हेलिकाॅप्टर घेतली आहेत. ई टेंडरिंग व एजन्सी नियुक्त करून ही हेलिकाॅप्टर भाड्याने घेण्यात आली असली तरी ती वादग्रस्त असलेल्या आॅगस्टा वेस्टलँड कंपनीची आहेत. आॅगस्टा वेस्टलँड व फिनमेकॅनिका या कंपन्या दोषी आढळल्याने त्यांची सीबीआय व ईडी चौकशी यूपीए सरकारने सुरू केली होती. त्यावेळी भाजपनेही या कंपन्यांविराेधात आवाज उठवला होता. आता त्याच कंपनीची सेवा भाजपचे सरकार घेत आहे.

व्हीअायपी संस्कृतीचा माेह सुटेना
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्हीअायपी संस्कृती माेडीत काढण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू केलेले असताना राज्यातील काही मंत्री मात्र अजूनही ‘व्हीअायपी कल्चर’मधून बाहेर पडलेले नसल्याचेच या हवाई दाैऱ्याच्या खर्चातून दिसून येते.
 
बातम्या आणखी आहेत...