आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध खरेदी घोटाळ्याची होणार चाैकशी, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरोग्य विभागातील औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यामार्फत करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी केली, तर ‘आपण दिलेला साठाबंदीचा निर्णय सर्वसामान्य जनतेला ऐन सणासुदीच्या काळात डाळ मिळावी म्हणून घेण्यात आला होता,’ अशा शब्दांत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही डाळ घोटाळ्याचे आरोप फेटाळले. आरोग्य विभाग आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील घोटाळ्यांबाबत विरोधी पक्षाने विधानसभेत उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला हे दोन्ही मंत्री उत्तर देत होते.

आरोग्य विभागाच्या औषध खरेदीत २९७ कोटींच्या घाेटाळ्याचा आरोप विरोधकांनी चर्चेत केला होता. त्या आराेपांना उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाला लागणारी साधनसामग्री आणि औषध खरेदी सचिव आणि संचालक स्तरावर केली जाते. मंत्र्यांशी या खरेदीचा कोणताही संबंध येत नाही. एवढेच नव्हे, तर मंत्र्यांच्या अवलोकनार्थसुद्धा अशी फाइल येत नाही, असा खुलासा करत दीपक सावंत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. तसेच नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत फक्त ४३ कोटी रुपयांची औषध खरेदी असताना २९७ कोटींचा घोटाळा हा आकडा आला कुठून? असा सवाल त्यांनी केला.

तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या डाळ घोटाळ्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार आरोप केले. ‘अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी डाळीवरील साठाबंदीचा कोणताही उल्लेख आपल्या प्रस्तावात केलेला नसतानाही संबंधित फाइल अतिरिक्त मुख्य सचिव, पणन यांच्याकडे गेल्यावर खाद्यतेल आणि खाद्यबियांसोबतच डाळींवरील निर्बंध उठवण्याच्या मुद्द्याचा या प्रस्तावात समावेश करण्यात आला. डाळीचा यात समावेश करण्याचे आदेश नेमके कुणी दिले?’ असा सवाल चव्हाण यांनी केला. वास्तविक साठाबंदी उठवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडे जाणे गरजेचे हाेते, असे सांगत या सर्व प्रकाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच ‘शेजारच्या तामिळनाडू राज्याने डाळीवरची साठाबंदी उठवण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही घेतला,’ असे मुख्यमंत्री या सभागृहात म्हणाले. मात्र, असा कोणताही निर्णय शेजारच्या तामिळनाडू सरकारने घेतलाच नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली, असा आरोपही त्यांनी केला.

भ्रष्टाचार झाला असेल तर राजकारण साेडू : बापट
आरोपांना उत्तर देताना बापट म्हणाले, ‘राज्य सरकारने सवलतीच्या दरात विक्री केलेल्या डाळींची किंमत फक्त ५१ कोटी असताना त्यात १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कसा काय होऊ शकतो? माझ्यावर जर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला तर आपण राजकारणातून बाहेर जाऊ,’ असे अाव्हान देत बापट यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. मात्र, अन्न आणि नागरी पुरवठा विभागात आजही मोठ्या प्रमाणावर चोरी होते, हे मात्र त्यांनी कबूल केले. मात्र, सचिवांनी प्रस्तावात परस्पर केलेल्या बदलाच्या चौकशीबाबत विराेधकांनी केलेली मागणी मात्र फेटाळून लावली.
बातम्या आणखी आहेत...