आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नाकर गायकवाडांची चाैकशी हाेणार, आंबेडकर भवन पाडापाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील ऐतिहासिक आंबेडकर भवन इमारतीच्या वादग्रस्त पाडापाडीमध्ये माजी आयएएस अधिकारी आणि राज्याचे विद्यमान माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
आंबेडकर भवन पाडण्यात गायकवाडांची काय भूमिका हाेती, याची चौकशी केली जाईल व चौकशी अहवाल राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. पोलिस आणि गृह खाते या पाडापाडीची चौकशी करतील, असे फडणवीस यांनी विधानसभेत भारिप- बहुजन महासंघाचे आमदार बळीराम शिरसकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

आंबेडकरांच्या कुटुंबीयांनी होकार दिला तर पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टऐवजी राज्य सरकारच आंबेडकर भवनाची पुनर्बांधणी करण्यास तयार आहे. बुद्धभूषण प्रीटिंग प्रेसला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मध्य मुंबईच्या दादर भागातील आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू असून स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच इमारतीत राजकीय पक्ष स्थापन केला होता. बाबासाहेबांची वृत्तपत्रे याच इमारतीत असलेल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जात होती. रत्नाकर गायकवाड सदस्य असलेल्या पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टकडे या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी होती. गेल्या महिन्यात याच ट्रस्टने मोडकळीस आल्याचे कारण सांगून आंबेडकर भवन पाडले. मात्र त्यामुळे आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली. डॉ. आंबेडकरांचे नातू प्रकाश आणि आनंदराज यांनी गायकवाडांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले असून न्यायालयाने दोन्ही बाजूंना ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...